मुंबईतील घाऊक व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घालणारी गुजरातची ‘चेक बाऊन्स’ टोळी जेरबंद; दिंडोशी पोलिसांची मीरा रोड अन् मालवणीत मोठी कारवाई

मुंबई (pragatbharat.com) : घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांना मोठ्या खरेदीचे आमिष दाखवून, लाखो रुपयांचा माल पदरात पाडून घेतल्यानंतर बनावट चेक देऊन पसार होणाऱ्या गुजरातच्या एका आंतरराज्यीय भामट्या टोळीचा दिंडोशी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने मुंबईतील अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी या टोळीच्या मुख्य सूत्रधारासह चार सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. मस्जिद बंदर येथील एका व्यापाऱ्याने गेल्या महिन्यात दिलेल्या तक्रारीवरून या मोठ्या घोटाळ्याचा छडा लागला आहे.

भाड्याने कार्यालय थाटून विश्वास संपादन करायचे; अशी होती ‘मोडस ऑपेरंडी’ पोलीस तपासात या टोळीची धक्कादायक कार्यपद्धती (Modus Operandi) समोर आली आहे. या टोळीचा मुख्य म्होरक्या मेहुल जगानी याने मीरा रोड परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता, तर टोळीतील इतर तीन सदस्य मुंबईतील विविध हॉटेल्समध्ये मुक्काम करायचे. हे भामटे मुंबईतील वेगवेगळ्या भागात विविध कंपन्यांच्या नावाने तात्पुरती कमर्शियल कार्यालये भाड्याने घ्यायचे आणि तिथे स्थानिक कर्मचाऱ्यांची भरती करून ती कार्यालय खरी असल्याचे भासवायचे. त्यानंतर ते घाऊक बाजारातील (Wholesale Market) व्यापाऱ्यांशी संपर्क साधून लाखो रुपयांच्या मालाची मोठी ऑर्डर देत असत.

माल डिलिव्हर होताना सुरुवातीला रोख रक्कम किंवा ऑनलाईन पेमेंट करण्याचे आश्वासन दिले जायचे, मात्र माल हातात पडताच व्यापारी किंवा त्यांच्या डिलिव्हरी बॉयच्या हातात बँकेचे धनादेश (Cheques) टेकवले जायचे. व्यापारी बँकेत चेक जमा करेपर्यंत ही टोळी कार्यालयाला टाळे ठोकून सर्व मालासह रातोरात गायब व्हायची. मस्जिद बंदर येथील एका व्यापाऱ्याला अशाच प्रकारे ३.२४ लाख रुपयांचा गंडा घालून या टोळीने पळ काढला होता, तसेच पैसे मागितल्यावर व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

मीरा रोड आणि मालवणीत पोलिसांची छापेमारी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त (DCP) गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे आणि एपीआय ओम तोटावार यांच्या शोध पथकाने या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मीरा रोड येथील एका हॉटेलमधून दोघांना आणि मालवणी परिसरातून उर्वरित दोन आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मेहुल जगानी (४३ – मुख्य सूत्रधार), गोपाल रायचुरा (३०), नीरव लखानी (३८) आणि एहसान खान यांचा समावेश आहे. मुख्य आरोपी मेहुल जगानी याच्यावर मुंबई आणि गुजरातमध्ये यापूर्वीही अनेक आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून, फसवणूक करून पळवलेला लाखो रुपयांचा माल हस्तगत करण्याचे काम पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *