
मुंबई (pragatbharat.com) : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) वेगवेगळ्या दोन कारवायांमध्ये मोठी यशस्वी कामगिरी केली आहे. पहिल्या कारवाईत गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने (Anti-Extortion Cell) दक्षिण मुंबईत सापळा रचून तीन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल तीन विदेशी बनावटीची पिस्तुले आणि ४७ जिवंत काडतुसे (Live Cartridges) जप्त केली आहेत. तर दुसऱ्या कारवाईत, पश्चिम बंगालमधील एका आश्रमाबाहेर झालेल्या बॉम्बफेक प्रकरणातील दोन मुख्य संशयितांना गुन्हे शाखेच्या गुप्तचर विभागाने (CIU) बोरिवली रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले आहे.
विदेशी शस्त्रे विकताना रंगेहात पकडले: गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, इतर राज्यातील काही लोक बेकायदेशीर शस्त्रास्त्रे आणि जिवंत काडतुसे विकण्यासाठी मुंबईत येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास दक्षिण मुंबईतील पी. डी’मेलो रोडवर, ईस्टर्न फ्रीवेच्या (Eastern Freeway) दिशेने जाणाऱ्या रस्त्याजवळ आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या परिसरात कडक सापळा रचला. संशयित आरोपी शस्त्रे विकण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्या झडतीत ३ विदेशी पिस्तुले, मॅगझिन आणि ४७ जिवंत काडतुसे असा मोठा साठा जप्त करण्यात आला.
आरोपींचा खंडणीच्या गुन्ह्यांशी संबंध; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन: याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात (MRA Marg Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघे जण २०२२ पासून खंडणीच्या (Extortion) गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही संपूर्ण कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि संयुक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पश्चिम बंगालमधील बॉम्बस्फोटाचे संशयित बोरिवलीत जेरबंद: दुसऱ्या एका कारवाईत, गुन्हे शाखेच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटने (CIU) पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या बॉम्बफेक प्रकरणातील दोन आरोपींना बोरिवली रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर १४ मे रोजी बहरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आश्रमाबाहेर बॉम्ब फेकण्यात आले होते. या घटनेनंतर तिथली सुरक्षा यंत्रणा चक्रावून गेली होती.
तेथील पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी हे दोन्ही आरोपी पळून मुंबईत आले होते. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे रॉकी खान (वय २४, व्यवसाय- चालक) आणि शहादत सरकार (वय ३५, व्यवसाय- मजूर) अशी आहे. मुंबई पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाने मंजूर केलेल्या दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडसह (Transit Remand) या दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

