मृतदेहासोबत लग्न करणाऱ्या आंचलचा धक्कादायक खुलासा! ‘या’ गंभीर कारणामुळे सोडलं सक्षमचं घर; सासरच्यांवर केले आरोप

नांदेड (pragatbharat.com) : सुमारे सहा महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नांदेडमधील सक्षम ताटे हत्या प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. सक्षमच्या हत्येनंतर त्याच्या मृतदेहासोबत विवाह करून आयुष्यभर त्याच्याच घरी राहण्याची शपथ घेणारी त्याची प्रेयसी आंचल मामिडवार हिने सासरचे घर सोडले आहे. आंचल घर सोडून पुन्हा आपल्या वडिलांकडे गेल्याची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, आता स्वतः आंचलने समोर येत घर सोडण्यामागचे अत्यंत खळबळजनक कारण उघड केले आहे.

सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप: सक्षमची आई संगीता ताटे यांनी आरोप केला होता की, आंचल आजीला भेटण्याचे निमित्त करून घर सोडून निघून गेली. या आरोपांना चोख उत्तर देताना आंचलने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत थेट सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप केले आहेत. आंचल म्हणाली, “सक्षमचा लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन (Misbehavior) करत होता. हा सर्व प्रकार मी सक्षमच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या कानावर घातला, परंतु त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवण्यास साफ नकार दिला.”

पोलिसांच्या संरक्षणात सोडले घर: पुढे बोलताना आंचलने स्पष्ट केले की, “जर घरातच माझ्यासोबत काही चुकीचे घडले आणि कुटुंबियांनी पाठराखण केली नाही, तर पुढे मोठी दुर्घटना घडू शकली असती. म्हणूनच मी कोणालाही न फसवता, रीतसर सक्षमच्या कुटुंबियांना कल्पना देऊन आणि स्थानिक पोलिसांना या परिस्थितीची माहिती देऊन घर सोडण्याचा निर्णय घेतला. पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः माझ्यासोबत येऊन मला सुरक्षितपणे माझ्या वडिलांच्या घरी सोडवले आहे.”

ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर: आंचलने सासरचे घर सोडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत होती आणि तिला ट्रोल केले जात होते. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आंचलने म्हटले आहे की, “माझ्या परिस्थितीचा आणि वास्तवाचा कोणताही विचार न करता लोक समाजमाध्यमांवर आरोप करत आहेत. कोणत्याही मुलीवर काय बेतले आहे, हे सत्य जाणून घेतल्याशिवाय कोणावरही चिखलफेक करू नये.” आंचलच्या या नवीन खुलाशामुळे आता ताटे आणि मामिडवार कुटुंबातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *