
मुंबई (pragatbharat.com) : रात्री शांत झोप लागलेली असताना अचानक मध्येच जाग येते आणि अंगाला पूर्ण घाम सुटल्याचे जाणवते. उशी, चादर किंवा कपडे घामाने ओले झालेले असतात. अनेक लोक हा अनुभव घेतात, पण बहुतेक वेळा “उकाडा असेल”, “फॅन कमी असेल” किंवा “जास्त पांघरूण घेतले असेल” असे म्हणून त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, रात्री येणारा सततचा घाम (Night Sweats) हा केवळ उष्णतेमुळे नसून, तुमच्या शरीराकडून मिळणारा एखादा गंभीर आजाराचा संकेतही असू शकतो.
कधीतरी घाम येणे सामान्य, पण ‘या’ लक्षणांकडे देऊ नका दुर्लक्ष: तज्ज्ञांच्या मते, वातावरणामुळे कधीतरी रात्री घाम येणे सामान्य असू शकते. पण जर तुम्हाला वारंवार रात्री घाम येत असेल, त्यामुळे तुमची झोप मोडत असेल आणि त्यासोबतच ताप येणे, अचानक वजन कमी होणे, सतत खोकला असणे किंवा तीव्र अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसत असतील, तर त्याकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत गरजेचे आहे.
रात्री घाम येण्यामागची प्रमुख कारणे:
- हार्मोनल बदल (महिलांमध्ये): महिलांमध्ये रजोनिवृत्ती (Menopause) किंवा मासिक पाळी दरम्यान शरीरातील ‘इस्ट्रोजेन’ (Estrogen) आणि ‘प्रोजेस्टेरॉन’ (Progesterone) हार्मोन्समध्ये बदल होतात. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रण बिघडते आणि अचानक गरम वाटून घाम सुटतो.
- तणाव आणि चिंता (Anxiety & Stress): दिवसभराचा मानसिक ताण आणि काळजी यामुळे झोपेतही शरीर पूर्णपणे रिलॅक्स होत नाही. परिणामी, हृदयाचे ठोके वाढणे, अचानक जाग येणे आणि घाम येणे असे प्रकार घडतात.
- गंभीर आजारांचे सुरुवातीचे लक्षण: जर घाम इतका येत असेल की कपडे पूर्ण भिजत असतील, तर ते टीबी (TB), हायपरथायरॉईडीझम (Hyperthyroidism), स्लीप एपनिया (Sleep Apnea) किंवा मधुमेह (Diabetes) यांसारख्या गंभीर आजारांचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. तसेच काही विशिष्ट औषधांच्या ‘साइड इफेक्ट्स’मुळेही असे होऊ शकते.
बचावासाठी काय करावे? तज्ज्ञांचा सल्ला: सर्वात आधी घाबरून न जाता काही साधे बदल करणे गरजेचे आहे. झोपताना खोली नेहमी थंड आणि हवेशीर ठेवावी. हलके व सुती (Cotton) कपडे वापरावेत. रात्रीच्या वेळी जास्त मसालेदार, जड अन्न खाणे टाळावे तसेच कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन कमी करावे. मानसिक ताण कमी करण्यासाठी योगासने किंवा ध्यान (Meditation) करावे. मात्र, हे सर्व करूनही जर रात्रीचा घाम येणे थांबत नसेल, तर स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे न घेता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरेल.

