
मुंबई (pragatbharat.com) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राजकीय हल्ला चढवला आहे. “अयोध्या येथील राम मंदिराच्या दानपेटीतून तब्बल ५ कोटी रुपये चोरीला गेले आहेत आणि ही संपूर्ण व्यवस्था भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे,” असा खळबळजनक आणि गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणावरून त्यांनी थेट भाजपच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
१२ वर्षांत एकही पत्रकार परिषद नाही – राऊतांची टीका: संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळावर तोफ डागली. “पंतप्रधानांनी एका तपाच्या कार्यकाळात देशातील जनतेसमोर येऊन एकही खुली पत्रकार परिषद घेतलेली नाही. लोकशाहीत जनतेच्या आणि पत्रकारांच्या प्रश्नांना समोरे जाण्याचे धाडस त्यांनी दाखवायला हवे. त्यांनी १२ वर्षांत काय केले, याचा लेखाजोखा एका पत्रकार परिषदेत मांडला पाहिजे,” असे राऊत म्हणाले. तसेच, जागतिक दबावामुळे सरकारला ‘ऑपरेशन सिंदूर’ गुंडाळावे लागले, असा टोलाही त्यांनी लगावला.
पंडित नेहरू आणि मोदींची तुलना: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचा विक्रम मोडणे मोदींना कधीही शक्य नसल्याचे राऊत यांनी ठामपणे सांगितले. “नेहरूंनी कधीही विरोधी पक्ष किंवा संघटना फोडल्या नाहीत. त्यांच्यावर जाहीर टीका करणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींसारख्या नेत्यांचा त्यांनी आदर केला. नेहरूंनी देशासाठी आपली ८० हजार कोटी मूल्याची संपत्ती दान केली आणि एलआयसी, आयआयटी, तेल कंपन्यांसारखे सार्वजनिक उद्योग उभे केले. त्यांच्या काळात अदानी-अंबानी निर्माण झाले नाहीत. मोदींनी नेहरूंचा केवळ पदावर राहण्याचा विक्रम मोडला आहे, पण देशाच्या संविधानिक संस्था तुडवून ही घोडदौड सुरू आहे,” अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.


