“संभाजीनगर नाव लादलं, मनात आजही औरंगाबादच!”; माजी आमदार आसिफ शेख यांच्या विधानावर भाजपचे संजय केणेकर आक्रमक

मालेगाव/छत्रपती संभाजीनगर (pragatbharat.com) : राज्य सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ (Chhatrapati Sambhajinagar) करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन ३ वर्षे उलटली आहेत. मात्र, या नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकच्या मालेगावमधील ‘इस्लाम पार्टी’चे (ISLAM Party) अध्यक्ष आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी, “छत्रपती संभाजीनगर हे नाव आमच्यावर लादण्यात आले असून, आमच्या मनात आजही औरंगाबादच आहे,” असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर भाजपने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

“जनमताचा आदर न करता नाव लादले” – आसिफ शेख: माजी आमदार आसिफ शेख यांनी नामांतराच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत म्हटले की, “औरंगाबाद हे इतिहासप्रसिद्ध शहर आहे, ते इथून कुठेही जाणार नाही. सरकारने केवळ बहुमताच्या जोरावर शहराचे नाव बदलले. हे करताना शहरातील स्थानिक जनतेच्या भावनांचा विचार केला गेला नाही. सरकारने नाव बदलण्यापूर्वी जनतेचे मत विचारात घ्यायला हवे होते, त्यावर सुनावणी किंवा जनमत (Referendum) घ्यायला हवे होते. हे काहीही न करता छत्रपती संभाजीनगर हे नाव लादण्याचे काम केले गेले, पण लोकांच्या मनात आजही औरंगाबाद हेच नाव आहे.”

“ही तर झांकी आहे, बहुत कुछ मिटाना बाकी है!” – भाजप आमदाराचे प्रत्युत्तर: आसिफ शेख यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेताना भाजपचे आमदार संजय केणेकर (Sanjay Kenekar) यांनी अत्यंत तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. केणेकर म्हणाले, “आसिफ शेख यांनी हे विसरू नये की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, ज्यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. ही तर फक्त झांकी आहे, अजून खूप काही मिटवायचे बाकी आहे. यांचे देशविरोधी मनसुबे मातीत गाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे.”

कोण आहेत माजी आमदार आसिफ शेख? आसिफ शेख रशीद हे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील प्रमुख नेते आहेत. २०१४ ते २०१४ या काळात त्यांनी मालेगाव मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र’ म्हणजेच ‘ISLAM’ (इस्लाम) पार्टी नावाच्या नव्या पक्षाची स्थापना केली. सध्या मालेगाव महानगरपालिकेत हा पक्ष सत्तेत असून स्थानिक पातळीवर अत्यंत सक्रिय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *