
मुंबई (pragatbharat.com) : नागपूर येथील एका कार्यक्रमात प्रसिद्ध कथावाचक धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित व्यक्तीला थेट इशारा दिला आहे.
काय आहे नेमका वाद? नागपूरमधील जामठा येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी एक कथा सांगितली. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, “एका मोहिमेनंतर थकलेले शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींकडे गेले आणि त्यांनी आपला मुकुट त्यांच्या चरणी अर्पण करून राज्यकारभार सांभाळण्याची विनंती केली.” या विधानाला इतिहासकारांनी तीव्र विरोध केला असून, शिवरायांनी कधीही कोणाकडेही राज्य सोपवले नव्हते, असे स्पष्ट केले आहे. ऐतिहासिक पुराव्यांची छेडछाड केल्याचा आरोप आता धीरेंद्र शास्त्री यांच्यावर होत आहे.
रोहित पवारांची डायरेक्ट वॉर्निंग: या प्रकरणावर संताप व्यक्त करताना रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला आणि धीरेंद्र शास्त्री यांना इशारा दिला. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगणारा हा भोंडू यापुढे महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा गाठ आमच्याशी आहे.” रोहित पवारांनी पुढे असेही म्हटले की, सत्तेतील नेत्यांच्या उपस्थितीत असे घडते हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
राजकीय पडसाद: या विधानामुळे महाविकास आघाडीचे इतर नेतेही आक्रमक झाले असून, धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे, आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून केलेल्या शिवीगाळ प्रकरणामुळे आधीच वातावरण तापलेले असताना, आता या नवीन विधानामुळे राजकारण अधिकच पेटण्याची शक्यता आहे.

