
तिरुवनंतपुरम/कोझिकोड (pragatbharat.com) : देशात एका बाजूला इतर साथीचे आजार पसरत असतानाच आता ‘निपाह व्हायरस’ने (Nipah Virus) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. केरळ राज्यामध्ये या वर्षातील निपाह व्हायरसचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोझिकोड येथील एका ४३ वर्षीय व्यक्तीला या घातक व्हायरसची लागण झाल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण केरळ राज्यात प्रशासनाकडून तातडीने ‘हायअलर्ट’ (High Alert) जारी करण्यात आला असून आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर सक्रिय झाली आहे.
केरळमधील आठ वर्षांतील सहावे संक्रमण मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णाला सौम्य ताप आल्यानंतर सुरुवातीला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, लक्षणे संशयास्पद वाटल्याने त्याला कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा (NIV) अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर केरळचे आरोग्यमंत्री के. मुरलीधरन यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. हा रुग्ण अनेक लोकांच्या संपर्कात आल्याचे समोर आले असून, रुग्णालयातील कर्मचारी आणि इतर संभाव्य व्यक्तींना तातडीने क्वॉरंटाईन (विलगीकरण) राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केरळमध्ये २०१८ नंतर निपाहचे हे सहावे संक्रमण आहे. यापूर्वी २०२४ मध्ये दोन रुग्ण सापडले होते, ज्यातील एकाचा मृत्यू झाला होता.
वटवाघाळांमुळे संसर्ग झाल्याचा संशय आणि रुग्णाचा ‘रूट मॅप’ प्राथमिक तपासानुसार, या रुग्णाने अलीकडेच एक जुने गोदाम भाड्याने घेतले होते आणि त्याची स्वच्छता त्याने स्वतः केली होती. या गोदामात असलेल्या ‘फ्रूट बॅट’ (फळे खाणारी वटवाघाळे) च्या विष्ठेमुळे किंवा संपर्कामुळे त्याला हा संसर्ग झाल्याचा संशय आहे. सध्या प्रशासनाकडून या रुग्णाचा संपूर्ण ‘रूट मॅप’ तयार केला जात असून त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असले तरी सध्यातरी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
निपाह व्हायरसचा इतिहास आणि भारताचा वेगळा पॅटर्न:
- मलेशियात पहिली केस (१९९८-९९): या व्हायरसचा शोध सर्वप्रथम मलेशियातील ‘सुंगाई निपाह’ या गावात लागला, ज्यावरून याचे नाव ‘निपाह’ पडले. तिथे वटवाघाळांमधून हा व्हायरस डुकरांमध्ये आणि नंतर माणसांमध्ये पसरला होता. त्या वेळी मलेशियात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
- भारतात २००१ मध्ये पहिला शिरकाव: भारतात निपाहचा पहिला रुग्ण २००१ मध्ये पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे सापडला होता. त्या वेळी ६६ पैकी ४५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २००७ मध्ये बंगालच्या नादियात ५ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
- भारतातील वेगळा पॅटर्न: मलेशियात हा आजार डुकरांच्या माध्यमातून पसरला होता. मात्र, भारत आणि बांगलादेशमध्ये वटवाघाळांनी चाटलेली फळे किंवा त्यांच्या थेट संपर्कामुळे मानवामध्ये हा विषाणू पसरत असल्याचा वेगळा पॅटर्न संशोधनातून समोर आला आहे.


