
जळगाव/मुंबई (pragatbharat.com) : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतील (Jalgaon MLC Election) अत्यंत चर्चिक आणि कळीचा ठरलेला बंडखोरीचा तिडा अखेर यशस्वीरीत्या सुटला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे (Reshma Kale) यांनी आपली बंडखोरी मागे घेत महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eamath Shinde) यांच्याशी मुंबईत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर रेश्मा काळे यांनी हा मोठा निर्णय घेतला असून, यामुळे नाशिक पाठोपाठ जळगावमधीलही बंड शमवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले आहे.
सकाळपासून ‘नॉट रिचेबल’ असलेल्या रेश्मा काळेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा: जळगाव विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ भाजपच्या बाजूने असल्याने महायुती सुरुवातीला निर्धास्त होती. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांनी अपक्ष म्हणून बंडाचे निशाण फडकवल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. शनिवार सकाळपासूनच रेश्मा काळे या ‘नॉट रिचेबल’ झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. अखेर त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा मान राखत आपण आपला निवडणूक प्रचार थांबवत असून, महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करणार असल्याचे रेश्मा काळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
१८ जूनला होणार ११ जागांसाठी मतदान: या घडामोडीनंतर महायुतीचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्यातील विधान परिषदेच्या एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यातील ६ जागांवर आधीच महायुतीचा बिनविरोध विजय झाला असून, आता उर्वरित ११ जागांसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे. जळगाव आणि नाशिकमधील बंडखोरीचा पेच सुटल्यामुळे आता या अकराही जागांवर महायुतीचे उमेदवार बहुमताने विजयी होतील, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.


