
मुंबई (pragatbharat.com) : देशातील निवडणूक प्रक्रिया आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम (EVM) च्या विश्वासार्हतेवरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि मोदी सरकारवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. सुप्रीम कोर्टात ईव्हीएममधील गडबडीचे प्रकरण पोहोचताच भाजपने मशिन्स जाळून टाकल्याचा थेट दावा पटोले यांनी केला असून, “ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी” या म्हणीप्रमाणे भाजपचा कारभार सुरू असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह: माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी पश्चिम बंगाल मधील निवडणूक प्रक्रियेवर आणि ईव्हीएम मशिन्सच्या सुरक्षेवर तीव्र आक्षेप घेतले. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगापासून ते संपूर्ण निवडणूक व्यवस्थापनापर्यंत सर्वच स्तरावर भाजपच्या बाजूने ‘मॅच फिक्सिंग’ करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला. हे संपूर्ण प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेले असून ईव्हीएममधील फेरफार लोकांसमोर उघड होण्याची भीती निर्माण झाल्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएम मशिन्स जाळण्यात आल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा: या राजकीय आरोपांसोबतच नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले. पंढरपूर येथे शेतकरी कर्जमाफीच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पटोले यांनी जाहीर केले.
फडणवीस सरकारच्या कर्जमाफीवर टीका: नाना पटोले यांनी राज्यातील भाजपच्या २०१४ ते २०११ या काळातील देवेंद्र फडणवीस सरकारवरही निशाणा साधला. २०१६ मध्ये जाहीर झालेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ फसवणूक होती, असा आरोप त्यांनी केला. सरकार बदलले तरी अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण झालेली नाही. बँकांकडून आधी पैसे भरण्याची सक्ती केली जात असून, कर्जमाफ होण्याऐवजी शेतकऱ्यांच्या खिशातूनच पैसे काढले जात आहेत, ही अत्यंत क्लेशदायक बाब असल्याचे म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरले.


