
नवी दिल्ली/मुंबई (pragatbharat.com) : मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख आर्थिक केंद्रांमधील प्रवास आता अधिक सुपरफास्ट होणार आहे. भारतीय रेल्वे देशातील हाय-स्पीड रेल (बुलेट ट्रेन) नेटवर्कचा प्रचंड विस्तार करण्याच्या तयारीत असून, याद्वारे ७ प्रमुख कॉरिडॉर विकसित केले जाणार आहेत. अंदाजे १६ लाख कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे प्रमुख शहरांमधील प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार आहे. यामध्ये मुंबई-पुणे कॉरिडॉर हा सर्वात महत्त्वाचा आणि लक्षवेधी ठरणार आहे.
मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत: सध्या मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या पारंपरिक रेल्वे गाड्या किंवा रस्ते मार्गाने प्रवास करण्यासाठी साधारण साडेतीन ते चार तास लागतात. मात्र, रेल्वेच्या नव्या प्रस्तावानुसार, १७० किलोमीटर लांबीच्या मुंबई-पुणे समर्पित हाय-स्पीड नेटवर्कमुळे हा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. या मार्गाचा सर्वाधिक फायदा व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होईल. मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि पुणे यांच्यातील आर्थिक एकात्मता मजबूत करण्यासाठी आणि सध्याच्या रस्ते-रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास रेल्वे नियोजनकारांनी व्यक्त केला आहे.
देशातील प्रमुख शहरे हाय-स्पीडने जोडणार: रेल्वेच्या या महाकाय आराखड्यामध्ये केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर उत्तर, पश्चिम आणि दक्षिण भारतातील प्रमुख शहरे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. अधिकार्यांच्या मते, भविष्यात दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नई या शहरांना जोडणारे एक अखंड (Seamless) हाय-स्पीड नेटवर्क तयार केले जाईल.

२०२७ मध्ये धावणार पहिली ‘स्वदेशी’ बुलेट ट्रेन: दरम्यान, देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, ट्रॅक टाकण्याच्या कामाने वेग घेतला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत एका स्वदेशी हाय-स्पीड ट्रेन प्लॅटफॉर्मवर काम करत असून, संपूर्णपणे भारतात तयार झालेली पहिली बुलेट ट्रेन २०२७ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा गुजरात मधील सुरत ते बिलिमोरा दरम्यान सुरू होणार असून, त्यानंतर संपूर्ण कॉरिडॉरवर सेवा विस्तारली जाईल.
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, हाय-स्पीड रेल हा देशांतर्गत विमान प्रवासाला एक उत्तम आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरणार असून, यामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांती घडून येईल.



