
मुंबई/दिल्ली (pragatbharat.com) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार नाराज असून ते पक्षाबाहेर पडणार आणि वेगळा गट स्थापन करणार, अशा चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच जोर पकडला आहे. दिल्लीत ठाकरे गटाच्या एका खासदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्याची भेट घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर या चर्चांना उधाण आले. या सर्व घडामोडींवर आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मात्र, यावेळी विचारलेल्या प्रश्नांवरून राऊत चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी पत्रकारांना जागेवरच सुनावले.
पक्षाचे ९ खासदार एकत्र; मातोश्रीचे दरवाजे सदैव उघडे: उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर खासदार नाराज असल्याच्या प्रश्नाचा संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “अशी नाराजी त्यांनी कधी आणि कोणाला बोलून दाखवली? शरद पवारांनंतर उद्धव ठाकरे यांच्याइतका लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना भेटणारा दुसरा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही. ‘मातोश्री’चे दरवाजे सर्वांसाठी सदैव उघडे आहेत. ग्रामीण भागातील खासदार आणि आमदार मुंबईत आले की नियमितपणे उद्धव ठाकरेंची भेट घेतात. तुमच्यापर्यंत आलेली बातमी पूर्णपणे चुकीची असून, या क्षणी शिवसेनेचे सर्व ९ खासदार पूर्णपणे एकत्र आणि पक्षासोबत निष्ठावंत आहेत.”
पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत चिडले, म्हणाले ‘उलटतपासणी घेऊ नका’: पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहून खासदार दिल्लीत मागच्या दाराने मंत्र्यांना भेटायला जातात, या पत्रकारांच्या थेट प्रश्नावर संजय राऊत यांचा पारा चढला. पत्रकारांवर संताप व्यक्त करत ते म्हणाले, “तुम्ही माझी उलटतपासणी (Cross-Examination) घेताय का? प्रश्न विचारा, पण उलटतपासणी घेऊ नका. पत्रकारांचे प्रश्न पत्रकारांसारखेच असायला हवेत. एखादा खासदार मंत्र्याला भेटला, तर त्यात एवढी आतडी पिळवटून विचारण्याची काय गरज आहे?” पुढे बोलताना त्यांनी खासदारांचा बचाव केला आणि म्हणाले, “उद्या मीही माझ्या कामासाठी किंवा राष्ट्रहिताच्या विषयासाठी पंतप्रधानांना भेटू शकतो. पंतप्रधान आणि मंत्री हे संपूर्ण देशाचे असतात, कुठल्या एका पक्षाचे नसतात.”
ईडी, सीबीआय आमच्या हातात असती तर… यावेळी बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवरही कडाडून टीका केली. “आज ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) हा केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा धाक आहे. जर ईडी, सीबीआय आमच्या हातात असती, तर आम्हालाही लोकांवर असा धाक ठेवता आला असता. पण लक्षात ठेवा, उद्या तुम्ही सत्तेवर नसाल, तर तुमचा हा धाक कुठे असेल?” असा इशाराही राऊत यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिला. राऊत यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.


