
छत्रपती संभाजीनगर (pragatbharat.com) : विधान परिषद निवडणुकीच्या (MLC Election) रणधुमाळीत छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक अत्यंत खळबळजनक आणि नाट्यमय राजकीय घडामोड समोर आली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या (शिवसेना उबाठा) अधिकृत उमेदवार देवयानी पाटील डोणगावकर यांनी ऐनवेळी निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांचे पती आणि गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या संचालक मंडळाला प्रशासनाकडून गंभीर आर्थिक अनियमिततेची नोटीस बजावण्यात आल्यानंतर ही घडामोड घडल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. आता त्यांच्या जागी ठाकरे गटाकडून गणेश लोखंडे हे नवे उमेदवार असतील.
साखर कारखान्याला नोटीस आणि राजकीय दबाव? गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर आणि त्यांच्या संचालक मंडळाविरोधात गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेचा ठपका ठेवत ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे, तसेच कारखाना समिती बरखास्त करण्याची तयारी सुरू झाली आहे. यावर डोणगावकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर राजकीय दबाव टाकण्यासाठीच ही नोटीस पाठवण्यात आली आहे, पण आम्ही या दमबाजीला भीक घालत नाही. आम्ही या नोटीसविरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत,” असे कृष्णा पाटील डोणगावकर यांनी स्पष्ट केले.
अंबादास दानवे यांना आधीच दिली होती कल्पना: आपल्या पत्नीच्या माघारीवर अधिक स्पष्टीकरण देताना डोणगावकर म्हणाले की, “जेव्हा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उमेदवारीसाठी माझ्या पत्नीचे फोटो मागितले, तेव्हाच मी त्यांना पर्यायी उमेदवार तयार ठेवण्यास सांगितले होते. ही निवडणूक अत्यंत खर्चिक आहे आणि भाजप-शिंदे यांच्यातील अंतर्गत गणिते पाहता इथे लढण्यात काही फायदा नव्हता. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही राजकीय मदतीचा प्रयत्न केला, पण तिथून मदत मिळाली नाही. पराभव स्पष्ट दिसत असताना आहे ते गमावण्याची माझी तयारी नव्हती.”
जिल्हा बँकेची निवडणूक हेच मुख्य कारण: “मला सध्या माझ्या ताब्यातील सहकार क्षेत्र टिकवणे जास्त महत्त्वाचे आहे. माझ्यासाठी आगामी जिल्हा बँकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. भाजपचे मोठे नेते अतुल सावे यांच्यासारखे नेते बँक निवडणूक लढवत आहेत. दोन्ही निवडणुका एकाच वेळी लढवणे आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मला शक्य नव्हते, म्हणूनच मी पक्षाकडे विनंती करून पत्नीचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेप्रमाणेच जिल्हा बँकेतही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील,” असेही डोणगावकर यांनी त्राग्याने सांगितले. या नाट्यमय माघारीमुळे महायुतीचे पारडे आता या मतदारसंघात जड मानले जात आहे.


