ठाकरे गटाचे खासदार फुटणार? संजय राऊतांनी संपवला सगळा सस्पेन्स; अमित शाह आणि केंद्रीय यंत्रणांवर थेट हल्लाबोल

मुंबई (pragatbharat.com) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार पुन्हा एकदा फुटणार असून ते शिंदे गट किंवा भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहेत. या सर्व चर्चांवर आणि अफवांवर शिवसेना (UBT) नेते खासदार संजय राऊत यांनी आज पूर्णविराम लावला आहे. “आमचे सर्व खासदार पक्षासोबत अत्यंत मजबुतीने उभे आहेत. विरोधकांनी कितीही पायघड्या घातल्या, तरी आमचा कोणताही सहकारी कुठेही जाणार नाही,” असा ठाम विश्वास राऊतांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

“अमित शाहांची मुद्दाम वावटळ निर्माण करण्याची रणनीती” केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट निशाणा साधत संजय राऊत म्हणाले की, ही त्यांची एक ठरवून केलेली रणनीती आहे. मुद्दाम एखादी अफवा किंवा वावटळ निर्माण करायची आणि पक्षात फूट पडल्याचे चित्र उभे करायचे, हा त्यांचा धंदा आहे. आमच्या सर्व खासदारांशी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमचा नियमित संवाद सुरू आहे. ज्यांना पक्ष सोडून जायचे होते, ते आधीच गेले आहेत. लोकसभेच्या निवडणुकांना अजून ३ वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे, त्यामुळे खासदार फुटण्याच्या चर्चांमध्ये काडीचेही तथ्य नाही.

३५-४० वर्षे पदे उपभोगली, पण… बंडखोरांवर घणाघात नुकत्याच झालेल्या पक्षांतराचा संदर्भ देत राऊतांनी बंडखोरांवर तीव्र शब्दांत प्रहार केला. ते म्हणाले, “ज्यांना फुटायचे असते ते कोणत्याही परिस्थितीत फुटतात. बेईमानीची मानसिकता असलेला किडा एकदा शरीरात शिरला की तो माणसाचे मन आणि मेंदू दोन्ही पोखरून टाकतो. मग अशा लोकांनी पक्षात ३५ ते ४० वर्षे कितीही मोठी पदे उपभोगलेली असोत, ते शेवटी निष्ठा राखू शकत नाहीत.” खासदार विनायक राऊत यांच्याशी दुसऱ्या गटाने संपर्क साधल्याच्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, राजकारणात संवाद सुरूच असतो, संवाद साधला म्हणजे कुणी पक्ष सोडत नाही.

फोडाफोडीच्या राजकारणाला केंद्रीय यंत्रणा जबाबदार संजय राऊत यांनी देशातील सध्याच्या राजकीय फोडाफोडीच्या संस्कृतीला थेट केंद्रीय यंत्रणा आणि घटनात्मक संस्थांना जबाबदार धरले आहे. सत्ता आणि शक्तीचा वापर करून पक्ष फोडण्याच्या राजकारणाला देशाचे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, निवडणूक आयोग, ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि खुद्द न्यायालय जबाबदार आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. जोपर्यंत या देशातील सर्वोच्च आणि स्वायत्त संस्था निष्पक्षपणे काम करत नाहीत, तोपर्यंत सत्ताधाऱ्यांकडून अशीच राजकीय तोडफोड सुरू राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *