
पुणे (pragatbharat.com) : वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त करत राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “विकास लवांडे यांना झालेली अटक हा लोकशाहीचा खून आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
‘पोलीस यंत्रणा सरकारच्या ताटाखालचे मांजर’: शशिकांत शिंदे यांनी आरोप केला की, सध्याची पोलीस यंत्रणा पूर्णपणे सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. विकास लवांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी ज्यांनी शाईफेक केली, त्यांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. याउलट, एका खोट्या तक्रारीच्या आधारे लवांडे यांच्यावरच तत्परतेने कारवाई करण्यात आली. न्याय देणारेच जर सरकारच्या ताटाखालचे मांजर झाले असतील, तर जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात स्वतः शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी वाघोली पोलीस ठाण्याला भेट दिली.
जनता हुकूमशाहीचा अंत करेल: विकास लवांडे हे लढणारे सैनिक असून ते अशा दडपशाहीला घाबरणार नाहीत, असे सांगत शिंदे पुढे म्हणाले की, देशातील तरुण आणि सर्वसामान्यांमध्ये या सरकारप्रती मोठा उद्रेक आहे. जर लोकांवर असाच अन्याय होत राहिला, तर जनताच रस्त्यावर उतरून उठाव करेल आणि या हुकूमशाहीचा अंत केल्याशिवाय राहणार नाही.
नेमके काय आहे प्रकरण? युट्यूबवरील एका व्हिडिओमध्ये विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. याप्रकरणी ८ मे रोजी पुण्याच्या वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लवांडे यांनी न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र कोर्टाने तो फेटाळल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

