
परभणी (pragatbharat.com) : राज्यात एकीकडे प्रशासन आणि सरकारकडून कुठलीही इंधन टंचाई नसल्याचा दावा केला जात आहे. मात्र, दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती अत्यंत भयावह आणि चिंताजनक बनली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी (Petrol Diesel Shortage) नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, शेतकऱ्यांना डिझेलसाठी रात्री पंपांवरच काढाव्या लागत आहेत. आता या इंधन टंचाईला हिंसक वळण लागण्यास सुरुवात झाली असून, परभणीच्या मानवत मध्ये डिझेल भरण्याच्या कारणावरून ग्राहकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे, तर नंदुरबारच्या शहाद्यात एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
परभणीत सलग नवव्या दिवशी टंचाई; कॅन फेकून मारहाण: परभणी जिल्ह्यात गेल्या नऊ दिवसांपासून डिझेल टंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बहुतांश पंपांवर “नो स्टॉक” (No Stock) चे फलक झळकत आहेत, ज्यामुळे नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. मानवत तालुक्यातील रूढी पाटी शिवारातील एका पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी वाहनांसह आणि हातात कॅन घेऊन नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यादरम्यान, रांगेत उभे राहण्याच्या आणि डिझेल भरण्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. संतापलेल्या तरुणांनी चक्क हातातले रिकामे प्लास्टिकचे कॅन एकमेकांवर फेकून मारण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून परिसर काही काळ तणावाखाली होता.
नंदुरबारच्या शहाद्यात शेतकऱ्याला मारहाण; ऑनलाईन पेमेंटचा राग: अशीच एक संतापजनक घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात घडली आहे. आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतीकामांसाठी एका शेतकऱ्याला डिझेलची अत्यंत आवश्यकता होती. तो डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर गेला असता, तेथे त्याचे पंप कर्मचाऱ्यांसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले. शेतकऱ्याकडे रोख रक्कम (कॅश पेमेंट) नसून त्याने ऑनलाईन पेमेंट करण्याची इच्छा व्यक्त केली. याचा राग आल्यामुळे पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी त्या शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
वाशिममध्येही सलग दहाव्या दिवशी तुटवडा: केवळ परभणी आणि नंदुरबारच नव्हे, तर वाशिम जिल्ह्यातही सलग दहाव्या दिवशी इंधनाचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. जिल्हा प्रशासनाने ७.३० लाख लिटर इंधन साठा उपलब्ध असल्याचा दावा केला आहे आणि नागरिकांना साठेबाजी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी आणि मालवाहतूक व्यावसायिकांची प्रचंड भटकंती सुरू आहे.
बळीराजा रडकुंडीला; खरीप हंगाम धोक्यात? सध्या मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असून शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ट्रॅक्टर आणि इतर शेती यंत्रांसाठी डिझेल अत्यंत गरजेचे आहे. मात्र, ऐन हक्काच्या वेळी डिझेल मिळत नसल्याने आणि पंपांवर तासन्तास उभे राहावे लागत असल्याने बळीराजा रडकुंडीला आला आहे. सरकारने केवळ कागदी दावे न करता प्रत्यक्ष बाजारात आणि ग्रामीण भागात डिझेलचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी आर्त मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


