
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाच्या (Merger) चर्चांनी प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना अत्यंत सूचक आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रातील ‘बकासुरां’शी लढायचे असेल, तर काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन एक मजबूत राष्ट्रीय काँग्रेस उभी केली पाहिजे,” असे आवाहन राऊत यांनी केले आहे.
“शरद पवारांनी पुढाकार घेऊन मजबूत काँग्रेस उभी करावी” संजय राऊत यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्याचे समर्थन करत राष्ट्रीय स्तरावरील भूमिका मांडली. ते म्हणाले, “ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव (KCR) किंवा शरद पवार हे सर्व नेते मूळचे काँग्रेस विचारधारेचे असून ते वेगवेगळ्या कालखंडात काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत. जर आता विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतील, तर शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घ्यावा. त्यांनी पुढाकार घेऊन मजबूत राष्ट्रीय काँग्रेस उभी केली, तर आमच्यासारख्या प्रादेशिक पक्षांनाही मोठी ताकद आणि बळ मिळेल.” महाभारताचा संदर्भ देत त्यांनी जोडले की, ज्याप्रमाणे पांडवांच्या बाजूने अनेक शक्ती एकत्र आल्या होत्या, त्याचप्रमाणे देशाच्या लोकशाहीसाठी काँग्रेसच्या बाजूने सर्व मूळ पक्ष एकत्र येणे गरजेचे आहे, नाही तर तेही टिकणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
“शिंदे-अजित पवार गट म्हणजे अमित शाह यांच्या कंपन्या!” याच वेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटांवर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला. राऊत म्हणाले, “या विषयाला कोणी वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करू नये. इथे मूळ राजकीय पक्षांचा प्रश्न आहे. शिंदे गट किंवा अजित पवार गट हे कोणतेही राजकीय पक्ष नाहीत, तर त्या अमित शाह यांच्या कंपन्या आहेत. सुप्रीम कोर्टात अद्याप त्यांचा अंतिम निर्णय व्हायचा बाकी आहे.” तसेच, जर अमित शाह यांच्या गटातील लोकांना पश्चात्ताप झाला असेल, तर त्यांनी खुशाल ‘मातोश्री’वर यावे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. राज ठाकरे यांचा पक्ष स्वतंत्र असून डावे कम्युनिस्ट पक्ष एकत्र येणार का, हा वेगळा मुद्दा असल्याचे सांगत त्यांनी सध्यातरी राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.


