
मुंबई (pragatbharat.com) : “सध्या देशाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. आता एकमेकांवर चिखलफेक करत राजकारण करण्याची नव्हे, तर एकत्र येऊन देश वाचवण्याची वेळ आली आहे,” अशा तीव्र शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती हल्ला चढवला आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुकारलेल्या उपोषणाला पाठिंबा देत सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर ‘अतिशय असंवेदनशील’ असल्याचा शिक्का मारला.
रोहित पवारांचे २४ तासांपासून अन्नत्याग आंदोलन; सुप्रिया सुळेंना सार्थ अभिमान: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी आक्रमक लढा सुरू केला आहे. या आंदोलनावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी रोहितला सुरुवातीपासून विनंती करत होते की तू उपोषण करू नको, कारण आपली लढाई मोठी आहे आणि समोरचे सरकार कमालीचे असंवेदनशील आहे. प्रचंड उन्हाळा असतानाही रोहितने गेल्या २४ तासांपासून अन्नाचा एक कणही घेतलेला नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रोहित इतका मोठा लढा उभा करतो आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. या असंवेदनशील सरकारशी लढण्यासाठी आपल्याला आपली ताकद टिकवून ठेवावी लागेल.”
पक्ष विलीनीकरणाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले मत: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या इतर पक्षात विलीनीकरणाच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी पूर्णविराम दिला. “विलीनीकरणाबाबत आम्हाला कोणीही संपर्क साधलेला नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि त्यांनीही कोणाला प्रस्ताव दिलेला नाही. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी या कामासाठी होत असतात. सध्या देशासमोर महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार हे खरे मोठे प्रश्न आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांनी केवळ ‘तू तू मै मै’ न करता, संकटात सापडलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकाला आधार देणे ही आमची मुख्य जबाबदारी आहे,” असे सुळे यांनी स्पष्ट केले. तसेच घर फोडणे आणि पक्ष फोडणे हे धंदे आम्ही कधीच केले नाहीत आणि करणारही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.


