
मुंबई (pragatbharat.com) : ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तू अनोळखी तरी सोबती’ या लोकप्रिय मालिकेतील अर्पिता म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आज घराघरात पोहोचली आहे. सध्या राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना, योगिताने आपल्या लहानपणीच्या उन्हाळी सुट्ट्यांमधील काही खास आणि मजेशीर आठवणींना उजाळा दिला आहे.
लहानपणीच्या दिवसांबद्दल बोलताना योगिता म्हणाली की, “तेव्हा आजच्यासारखी उन्हाची इतकी झळ जाणवायची नाही. मी ठाण्यातील किसननगर भागात राहायचे. उन्हाळ्यात रात्री लाईट गेल्यावर खूप गरम व्हायचे, तेव्हा आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी स्वतःच्या चादर-गाद्या घेऊन टेरेसवर झोपायला जायचो. तेव्हा कोणाकडेही मोबाईल फोन नव्हते, त्यामुळे तासनतास मनसोक्त गप्पा मारत आम्ही तिथे झोपायचो.”
योगिताने चाळीतील एका खास आठवणीचाही उल्लेख केला. उन्हाळ्यात चाळीतील अनेक कुटुंब लोणच्यासाठी टेरेसवर कैऱ्या वाळत घालायचे. “आम्ही मुले त्या कैऱ्या गुपचूप चोरून खायचो. जेव्हा ही चोरी सर्वांच्या लक्षात आली, तेव्हापासून टेरेसला कुलूप लावायला सुरुवात झाली,” असे तिने हसत हसत सांगितले.
आज कामाच्या गडबडीत दिवसाला ७-८ आंबे खाणे शक्य नसले तरी, आजही पुन्हा सुट्टी मिळाली तर मामाच्या गावाला जाऊन तेच बालपण जगण्याची इच्छा योगिताने व्यक्त केली आहे. सध्या सेटवर उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कलाकार आणि पडद्यामागची टीम भरपूर पाणी पिण्यावर आणि सनस्क्रीन वापरण्यावर भर देत आहे. योगिता आणि अंबर गणपुले यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.

