RCB vs KKR IPL 2026: विराट कोहलीचे ऐतिहासिक १० वे शतक; रायपूरमध्ये आरसीबीचा सर्वात मोठा ‘रन चेज’

रायपूर (pragatbharat.com) : आयपीएल २०२६ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आपल्या विजयाचा धडाका कायम राखत कोलकाता नाईट रायडर्सवर (KKR) ६ विकेट्सनी शानदार विजय मिळवला आहे. रायपूरच्या शहीद वीर सिंह नारायण सिंह स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराट कोहली नावाचे वादळ घोंघावले. विराटने अवघ्या ५८ चेंडूंमध्ये नाबाद १०५ धावांची खेळी करत इतिहास रचला.

कोलकाताने दिलेल्या १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने १९.१ षटकांतच विजय साकारला. विशेष म्हणजे, रायपूरच्या मैदानावर आयपीएल इतिहासातील हा सर्वात मोठा यशस्वी ‘रन चेज’ ठरला आहे. या विजयाचा खरा शिल्पकार ठरलेल्या विराटने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान पटकावला आहे. कोहलीच्या नावावर आता आयपीएलमध्ये एकूण ९ आणि टी-२० मध्ये एकूण १० शतकांची नोंद झाली आहे, ज्याद्वारे त्याने अभिषेक शर्माला मागे टाकले आहे.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना केकेआरने २० षटकांत ४ बाद १९२ धावा केल्या होत्या. सलामीवीर बाद झाल्यानंतर अंगक्रिश रघुवंशीने ७१ धावांची तर रिंकू सिंगने नाबाद ४९ धावांची खेळी करून संघाला मजबूत स्थितीत नेले होते. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. प्रत्युत्तरात आरसीबीची सुरुवात खराब झाली असली तरी, विराटने देवदत्त पडिक्कलसोबत ९२ धावांची भागीदारी करत सामना एकतर्फी झुकवला. केकेआरच्या कार्तिक त्यागीने ३ बळी मिळवून लढा देण्याचा प्रयत्न केला, मात्र विराटच्या झंझावातासमोर कोलकात्याचे गोलंदाज हतबल ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *