( प्रगत भारत । pragatbharat.com)
NIA Cash Reward For Info: राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधातील आपल्या कारवाईला गती दिली आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) या खलिस्तान समर्थक संघटनेचा दहशतवादी लखबीर सिंग संधू उर्फ ‘लांडा’ याला पकडून देणाऱ्यांसाठी बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार लांडाचा ठाव-ठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीला रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. खलिस्तानी दहशतवादी लांडाबरोबरच अन्य 4 बीकेआयच्या दहशतवादी हरविंदर सिंग सिंधू उर्फ रिंदा, परमिंदर सिंग कौरा उर्फ पट्टू, सतनाम सिंग उर्फ सतबीर सिंग उर्फ सत्ता आणि यादविंदर सिंग उर्फ यद्दा यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यांना बक्षीस दिलं जाईल माहिती एनआयने दिली आहे.
कोणावर किती बक्षीस?
एनआयएने रिंदा आणि लांडावर प्रत्येकी 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे तर पट्टू, सत्ता आणि यद्दासाठी 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. बीकेआयही एक बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना आहे. एनआयएने खलिस्तानी दहशतवांद्यांवर बक्षीस जाहीर केलं आहे. कॅनडियन पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात भारतीय एजंट्सचा समावेश असल्याचं विधान सोमवारी कॅनडियन संसदेमध्ये केलं.
भारताने फेटाळले आरोप
भारताने ट्रुडो यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि विशिष्ट हेतूने प्रेरित असल्याचा सांगत हा दावा खोडून काढला आहे. यानंतरच दुसऱ्याच दिवशी एनआयएकडून खलिस्तानी दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. एनआयएनेच यासंदर्भातील पत्रक जारी केलं आहे.
NIA INTENSIFIES CRACKDOWN ON KHALISTANI TERRORISTS OPERATING IN INDIA
ANNOUNCES CASH REWARD FOR INFO ON BKI TERRORISTS RINDA, LANDA & 3 OTHERS pic.twitter.com/nPWflc2j4s— NIA India (@NIA_India) September 20, 2023
बक्षीस जाहीर करण्यात आलेला लांडा कोण आहे ते पाहूयात…
1) पंजाबमधील तरनतारनमधील लखबीर सिंग लांडा हा मागील अनेक वर्षांपासून कॅनडातील अल्बर्टामधील एडमॉन्टनमध्ये राहतो.
2) पाकिस्तानी गँगस्टर ते दहशतवादी झालेल्या रिंदाचा निकटवर्तीय असलेला लांडा 2017 मध्ये कॅनडात पळून गेला. त्यानंतर त्याने खलिस्तान समर्थक बीकेआय संघटनेसाठी काम करण्यास सुरुवात केली.
3) लांडाविरोधातील पहिला गुन्हा जुलै 2011 मध्ये हिरे पत्तनची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दाखल झाला होता. शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झालेल्या. आता त्याच्याविरोधात अमृतसर, तरनतारन, मोगा, फिरजोपूर जिल्ह्यात हत्या, हत्येचा प्रयत्न आणि अंमली पदार्थांच्या सेवनाचे एकूण 18 गुन्हे दाखल आहेत. पंजाब पोलिसांनी लांडा कॅनडात पळून जाण्यापूर्वी त्याच्याविरोधात मे 2016 मध्ये मोगा येथे अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
4) लांडाविरोधात अमृतसरमधील एका उपनिरिक्षकाच्या कारखाली आयईडी स्फोटकं लावल्याबरोबरच मोहालीमध्ये पंजाप पोलिसांच्या गुप्त कार्यालयावर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने हल्ला करण्याच्या कटात सहभागी असल्याचाही आरोप आहे.
5) एनआयएने 2022 मध्ये लांडाविरोधात गुन्हा दाखल केला. परदेशामधील दहशतवादी संघटना आणि टार्गेट किलिंगमागे तसेच हिंसक घटनांमागे लांडाचा हात असल्याचं समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. परदेशात बसून भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये गुन्हेगारी कारवाई करण्यासाठी देशविरोधी टोळ्या आणि संघटनांबरोबर लांडा काम करत असल्याचं समोर आलं.
6) एनआयएच्या दाव्यानुसार हे चारही दहशतवादी भारतामधील वेगवेगळ्या संप्रदायांत असलेली सद्भावना बिघडण्याचा प्रयत्न करत आहे. हे दहशतवादी अंमली पदार्थाच्या तस्करीबरोबरच काही उद्योजक आणि प्रमुख व्यक्तींकडून खंडणी मागितल्या प्रकरणीही आरोपी आहेत.
भारतीयांना इशारा
परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये कॅनडात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी इशारा जारी केला आहे. भारतीयांविरोधातील हिंसक हल्ले आणि गुन्हे वाढण्याची शक्यता असल्याने ‘अत्यंत सावध राहा’ असा इशारा भारताने दिला आहे.