Big relief to public cheap tomatoes will be available from 14 July check rates;सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवसापासून टोमॅटो होणार स्वस्त

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Tomato Price Hike: टोमॅटोच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. 20,25 रुपये किलोने मिळणारे टोमॅटो नागरिकांना 100, 150 रुपये किलोने घ्यावे लागत आहेत. टोमॅटोला ‘सोन्याचा भाव’ मिळत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दरम्यान केंद्र सरकारने यावर देशभरात टोमॅटोच्या वाढत्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. केंद्राने बुधवारी सहकारी संस्था नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रमुख ग्राहक केंद्रांवर कमी दराने टोमॅटोचे वाटप केले जाणार आहे.

14 जुलैपासून टोमॅटो स्वस्त

विशेष म्हणजे गेल्या महिनाभरात टोमॅटोचे किरकोळ भाव झपाट्याने वाढले आहेत. 14 जुलैपासून टोमॅटो दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून कमी दराने विकले जातील, असे  ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

किलोमागे 200 रुपयांपर्यंत भाव वाढले

मुसळधार पावसामुळे टॉमेटोचा पुरवठा खंडित झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोच्या किरकोळ किंमती 200 रुपये किलोपर्यंत पोहोचल्या. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) टोमॅटो खरेदी करणार आहेत.

कमी किमतीत टोमॅटोचे वितरण

ज्या ठिकाणी टॉमेटोच्या किरकोळ किमती गेल्या एका महिन्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहेत अशा ठिकाणी कमी किमतीत टोमॅटोचे वितरण केले जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना कमी किंमतीत टोमॅटो मिळू शकणार आहे. ज्या ठिकाणी टोमॅटोचा वापर जास्त आहे, त्यांना वितरणासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. 

जुलै-ऑगस्टमध्ये टोमॅटोचे उत्पादन कमी

जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टोमॅटोचे उत्पादन कमी असते, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याशिवाय जुलैमध्ये पावसाळ्यामुळे वाहतुकीशी संबंधित अडचणींमुळेही दर वाढल्याचे पुढे सांगण्यात आले.

प्रामुख्याने हिमाचलमधून येतात टोमॅटो 

दिल्ली आणि परिसरात येणारे टोमॅटो प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातून येतात. याशिवाय टोमॅटो उत्पादनात दक्षिणेकडील राज्ये आघाडीवर आहेत. नाशिक जिल्ह्यातून नवीन पीक लवकरच येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. नजीकच्या काळात टॉमेटोचे भावदेखील खाली येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.