[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND Vs PAK World Cup rivalry
IND Vs PAK, World Cup : क्रिकेटच्या महायुद्धातील सर्वात मोठं घमासान उद्या अहमदाबादमध्ये रंगतंय. निमित्त आहे ते भारत-पाकिस्तान सामन्याचं. रोहितसेना बाबर आझमच्या पाक टीमला लोळवायला उत्सुक आहे. विश्वचषकाच्या मैदानात आतापर्यंत भारताने पाकिस्तानला सातवेळा चारीमुंड्या चीत केलंय. याच सात सामन्यांचा थरारअनुभवूया.
१) ४ मार्च, १९९२, सिडनी – हा सामना गाजला तो किरण मोरे आणि जावेद मियाँदाद यांच्यातल्या ठिणगीने. जावेद मियाँदादविरोधात किरण मोरेने केलेलं अपील जावेदला आवडलं नव्हतं. या दोघांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. तेव्हा मियाँदादने मारलेल्या उड्या क्रिकेटरसिकांच्या आजही लक्षात आहेत. भारतीय डावात सचिनने नाबाद ५४ तर कपिलने २६ चेंडूंत ३५ धावांची वेगवान खेळी करत संघाला २१६ चा पल्ला गाठून दिला. पाकिस्तान १७३ वर ऑलआऊट झाला, त्यांची झुंज तब्बल ४३ धावांनी कमी पडली. आमीर सोहेलच्या ६२ धावा आणि जावेद मियाँदादच्या ११० चेंडूंमधील ४० धावांच्या खेळीचा अपवाद वगळता पाकचा एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही आणि अझरच्या भारतीय टीमने इम्रानच्या पाकिस्तान टीमला चीत केलं. सचिन सामनावीर ठरला.
२) ९ मार्च, १९९६, बंगळुरु – उपांत्यपूर्व फेरीत यावेळी भारत-पाक भिडले ते बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर. पुन्हा एकदा पहिली फलंदाजी करत भारताने आठ बाद २८७ ची मजबूत मजल मारली. सिद्धूच्या ९३ धावांच्या खणखणीत खेळीने या धावसंख्येचा पाया रचला. या मॅचमध्ये लक्षात राहणारी फलंदाजी केली ती अजय जडेजाने. त्याने वकारचा स्लॉग ओव्हर्समध्ये ठोकलेले षटकार प्रतिहल्ला कसा करावा याचं उत्तम दर्शन घडवणारे होते. २५ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावांची वादळी खेळी तो खेळला. उत्तरादाखल पाकिस्तानने १० ओव्हर्समध्ये बिनबाद ८४ अशी झंझावाती ओपनिंग केली. सईद अन्वर-आमीर सोहेल जोडीने चौफेर टोलेबाजी केली. या मॅचमधील आमीर सोहेल-वेंकटेश प्रसाद युद्ध गाजलं. कव्हर्समधून प्रसादला सीमापार करणाऱ्या सोहेलने त्याच्याकडे पाहत आक्रमक इशारा केला आणि लगेचच प्रसादने त्याला क्लीन बोल्ड करत वचपा काढला.सलामीची जोडी बाद झाल्यावर पाकिस्तान ढेपाळली आणि ४९ ओव्हर्समध्ये नऊ बाद २४८चीच मजल त्यांना मारता आली. भारताने ३९ धावांनी सामना खिशात टाकला.
३) ८ जून, १९९९, मँचेस्टर – इंग्लिश वातावरणात पहिली फलंदाजी करताना भारताने सहा बाद २२७ ची मजल मारली. द्रविडच्या ६१ आणि कर्णधार अझरुद्दीनच्या ५९ धावांनी संघाला दोनशेची वेस ओलांडून दिली. अक्रम, अख्तर, रझाक, सकलेनच्या माऱ्याला भारताने समर्थपणे तोंड दिलं आणि ही धावसंख्या गाठली. तर, फलंदाजी करताना प्रसादच्या स्विंगसमोर पाकिस्तान निरुत्तर झाला. सईद अन्वर ३६, इंझमाम ४१, सईद अन्वर ३६ आणि मोईन खान ३४ असा अपवाद वगळता पाकिस्तानची बॅटिंग १८० वरच कोसळली. भारताने ४७ धावांनी मैदान मारलं.
४) १ मार्च, २००३, सेंच्युरियन – सईद अन्वरच्या १०१ धावांच्या वेगवान खेळीच्या बळावर पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना सात बाद २७३ ची मजल मारली. भारतासमोर सेंच्युरियनच्या वेगवान खेळपट्टीवर २७४ चा स्कोर गाठण्याचं आव्हान होतं. सचिन-सेहवाग मैदानात उतरले तेच आक्रमक गियर टाकत. भारताने ५.४ ओव्हर्समध्ये ५३ धावा फलकावर लावल्या. सचिन, सेहवाग वकार-अक्रम जोडीवर तुटून पडले. सचिनने शोएब अख्तरला थर्डमॅनला मारलेला षटकार काळजाचा ठोका चुकवणारा होता. तर, सेहवागनेही वकारला पॉईंट सीमारेषेवरुन प्रेक्षकांमध्ये भिरकावलेला फटका अजूनही लक्षात आहे. सचिन ७५ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकारासह ९८ धावांची संस्मरणीय खेळी खेळला. तो बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी ९७ धावांची गरज होती. युवराजच्या ५३ चेंडूंमधील नाबाद ५० तर द्रविडच्या ७६ चेंडूंमधील नाबाद ४४ धावांनी भारताची मोहीम ४५.४ ओव्हर्समध्ये सहा विकेट्सच्या मोबदल्यात फत्ते झाली.
५) ३० मार्च, २०११, मोहाली – पहिली फलंदाजी करणाऱ्या भारताने इथे २६० ला नऊ अशी धावसंख्या गाठली. सचिनची १११ चेेंडूंत ८५ धावांची इनिंग यादगार ठरली, त्याच वेळी सेहवागच्या २५ चेंडूंत ३८ धावांचा फटाकाही कमाल होता. त्या सामन्यापर्यंत पाकचा उमर गुल प्रतिस्पर्धी फलंदाजांना नामोहरम करणारे स्पेल टाकत होता. त्या सामन्यात सेहवागने त्याच्या एकाच ओव्हरमध्ये पाच चौकार ठोकत त्याचा कॉन्फिडन्स गुल केला. उमर गुलच्या गोलंदाजीच्या आकडेवारीचा आणि त्याचाही चेहरा पाहण्यासारखा होता. उमर गुलच्या ८ ओव्हर्समध्ये भारताने ६९ धावा लुटल्या. उत्तरादाखल मिसबाहच्या ५६ आणि हफीझच्या ४३ धावांच्या खेळीचा अपवाद वगळता पाकची फलंदाजी फ्लॉप झाली. त्यांचा डाव २३१ वर आटोपला. सेमी फायनलमध्ये २९ धावांनी विजय पताका फडकवत भारताने फायनल गाठली आणि पुढे चषकही पटकावला.
६) १५ फेब्रुवारी, २०१५, अँडलेड, – ऑसी मैदानात भारतीय फलंदाजी तळपली आणि भारताने ५० ओव्हर्समध्ये सात बाद ३०० चा मजबूत स्कोर गाठला. एव्हाना कोहली पर्व सुरु झालं होतं. त्याने १२६ चेंडूंत १०७, धवनने ७६ चेंडूंमध्ये ७३ तर रैनाने ५६ चेंडूंत ७४ धावांची वादळी खेळी करत संघाला तीनशेचा टप्पा गाठून दिला. मग शमीच्या वेगवान माऱ्यासमोर पाककडे उत्तर नव्हतं. मिसबाहच्या ७६ आणि शहजाद ४७ धावांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज कुचकामी ठरले आणि भारताने पाकला २२४ वर गुंडाळत ७६ धावांनी खणखणीत विजय साजरा केला. शमीने चार तर मोहित शर्मा आणि उमेश यादवने दोन दोन फलंदाज टिपत पाकच्या फलंदाजीचा कणा मोडला.
७) १६ जून, २०१९, मँचेस्टर – यावेळी पाकिस्तानने टॉस जिंकत इंग्लिश भूमीवर भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि जणू पायावर कुऱ्हाड मारुन घेतली. राहुल आणि रोहित शर्माने शतकी सलामी दिली. तिथपासून भारताने सामन्यावरची ग्रिप सोडली नाही. रोहित शर्मा ११३ चेंडूंत १४ चौकार, तीन षटकारांसह १४० धावांची मखमली खेळी खेळून गेला. राहुलने ७८ चेंडूंत ५७ धावा केल्या, तर धावांच्या या समुद्रात ६५ चेंडूंत ७७ धावा करत कोहलीनेही हात धुवून घेतले. भारताने पाच बाद ३३६ धावांचा डोंगर रचला. पावसामुळे पाकला ४० ओव्हर्समध्ये ३०२ चं लक्ष्य देण्यात आलं. पण, त्यांना सहा बाद २१२ धावाच करता आल्या. भारताने ८९ धावांनी कॉलर टाईट केली. फखर झमान ६२ आणि बाबर आझम ४८ तर इमाद वासिम ४६ या तिघांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज फ्लॉप ठरले. विजय शंकर, पंड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आणि भारतीय संघाने वर्ल्डकपमध्ये पाकविरुद्ध सातव्यांदा नैया पार केली आणि यशाचं इंद्रधनुष्य उजळून निघालं.
[ad_2]