[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
सतरा वर्षांत प्रथमच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) दोन वरिष्ठ पदाधिकारी अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला पाकिस्तानात दाखल झाले. आशिया कप वन-डे क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने हे दोघेही अटारी-वाघा सीमा पार करून लाहोरला गेले. ही भेट क्रिकेटपुरतीच मर्यादित आहे. त्यात कोणतेही राजकारण आणू नका, असे शुक्ला यांनी स्पष्टपणे सांगितले.
पाकिस्तानमध्ये २००८मध्ये आशिया कप स्पर्धा झाली होती. भारतीय संघ २००६नंतर पाकिस्तानात मालिका खेळलेला नाही. या मालिकेच्या वेळी बीसीसीआयचे पदाधिकारी पाकिस्तानात गेले होते. त्यानंतर प्रथमच बीसीसीआयचे पदाधिकारी पाकिस्तानात अधिकृत भेटीवर गेले आहेत. भारताने पाकिस्तानला आशिया कप स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे पाकिस्तान यजमान असलेल्या या स्पर्धेतील जास्त लढती श्रीलंकेत होणार आहेत. आशिया कप स्पर्धेच्या निमित्ताने पाकिस्तानातील पंजाबच्या राज्यपालांनी मेजवानीचे आयोजन केले होते. त्यास बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित केले होते. त्यासाठी माजी कसोटीपटू बिन्नी; तसेच काँग्रेसचे नेते शुक्ला गेले होते.
पाकिस्तान आशिया कप स्पर्धेचे यजमान आहेत. बीसीसीआयच्या शिष्टमंडळाची भेट क्रिकेटसाठीच आहे. त्यात कोणतेही राजकारण नाही. या दोन दिवसांच्या दौऱ्यात आम्ही मेजवानीत सहभागी होणार आहोत. या मेजवानीसाठी बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत, असे शुक्ला यांनी सांगितले. भारतीय क्रिकेट संघ २००४ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्याच्या वेळी पाकिस्तानात गेलेल्या शिष्टमंडळातही शुक्ला यांचा समावेश होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेबाबतचा निर्णय केंद्र सरकारच घेणार आहे. सरकारच्या निर्णयाचे आम्ही पालन करणार आहोत असे शुक्ला यांनी सांगितले. बिन्नी यांनी आपण २००६ नंतर प्रथमच पाकिस्तानात आलो असल्याचे सांगितले. त्या वेळी मी आशियाई क्रिकेट परिषदेचा सदस्य या नात्याने आलो होतो, असेही त्यांनी सांगितले.
[ad_2]