[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
महाराष्ट्र प्रीमिअर लीगची पहिली लढत पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स यांच्यामध्ये सुरु होती. त्यावेळी हा सामना सुरू असताना ऋतुराज गायकवाडच्या चाहत्याने मैदानात धाव घेतली. फलंदाजी करीत असलेल्या ऋतुराजच्या पाया पडल्यानंतर या चाहत्याने बाहेर जाण्यासाठी खूप वेळ घेतला. त्यामुळे चार-पाच मिनिटे लढत थांबली होती. अखेरीस सुरक्षारक्षकांनी त्याला कसेबसे बाहेर काढण्यात यश आले. मात्र, त्यानंतर पुन्हा दोन चाहत्यांनी मैदानावर अशीच धाव घेऊन खेळात व्यत्यय आणला.
कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि पवन शहा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पुणेरी बाप्पा संघाने गुरुवारी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लढतीत कोल्हापूर टस्कर्सवर आठ विकेटनी सहज विजय नोंदवला. गहुंज्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये एमपीएलला गुरुवारपासून प्रारंभ झाला. पुणेरी बाप्पा संघाचा कणर्धार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कोल्हापूर टस्कर्सने चांगली सुरुवात केली होती. केदार जाधव आणि अंकित बावणे यांनी ४८ चेंडूंत ६५ धावांची सलामी दिली. रोहन दामलेने केदार जाधवला बाद करून ही जोडी फोडली. केदारने २२ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह २५ धावांची खेळी केली. त्यानंतर अंकितने नौशाद शेखच्या साथीने कोल्हापूरला शतकी टप्पा पार करून दिला. सोळाव्या षटकात सचिन भोसलेने नौशादला बाद केले. त्यानंतर, पुढील चार षटकात कोल्हापूरने पाच विकेट गमावल्या. अखेरच्या चार षटकांत कोल्हापूरला २५ धावाच करता आल्या. त्यामुळे कोल्हापूरला निर्धारित २० षटकांत ७ बाद १४४ धावापर्यंतच मजल मारता आली. यात अंकित बावणेने ५७ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह ७२ धावांची खेळी केली.
प्रत्युत्तर देताना ऋतुराज गायकवाड आणि पवन शहा यांनी पुणेरी बाप्पा संघाला धडाक्यात सुरुवात करून दिली. त्यांनी ६० चेंडूंत ११० धावांची सलामी दिली आणि पुणेरी बाप्पा संघाच्या विजयाचा पाया रचला. श्रेयश चव्हाणच्या गोलंदाजीवर दहाव्या षटकात विद्य तिवारीने झेल सोडून ऋतुराजला जीवदान दिले. मात्र, याच षटकात श्रेयशने अंकितकरवी ऋतुराजला बाद केले. ऋतुराजने २७ चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांसह ६४ धावांची खेळी केली. त्यानंतर पवन शहाने सूरज शिंदेच्या साथीने पुणेरी बाप्पा संघाला विजयाच्या समीप पोचवले. विजय दृष्टिपथात आला असताना पवन बाद झाला. त्यानंतर सूरज आणि यश क्षीरसागर यांनी पुणेरी बाप्पाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
[ad_2]