[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मेडेलिन (कोलंबिया) : भारताच्या अभिषेक वर्माने तिरंदाजी वर्ल्ड कपच्या तिसऱ्या टप्प्यात पुरुषांच्या कम्पाउंड प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. ३३ वर्षीय अभिषेकने अंतिम फेरीत अमेरिकेच्या जेम्स लुत्झवर १४८-१४६ अशी मात केली.अंतिम फेरीत पहिल्या सेटमध्ये अभिषेक आणि जेम्सने प्रत्येकी ३० गुण मिळवले, तर दुसऱ्या सेटमध्ये दोघांनी प्रत्येकी २९ गुण मिळवले. तिसऱ्या सेटमध्ये जेम्सने ३० गुण मिळवून एका गुणाची आघाडी मिळवली. चौथ्या सेटमध्ये अभिषेकने ३०, तर जेम्सने २८ गुण मिळवले. त्यामुळे अभिषेककडे जेम्सविरुद्ध ११८-११७ अशी एका गुणाची आघाडी होती. त्यामुळे अखेरच्या सेटमधील तीन प्रयत्नांत चुरस वाढली होती. यातील पहिल्या प्रयत्नात जेम्सने नऊ गुणांचा, तर अभिषेकने दहा गुणांचा वेध घेतला. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात दोन्ही तिरंदाजांनी प्रत्येकी दहा गुण मिळवले. २०१९चा वर्ल्ड चॅम्पियन जेम्सने अखेरच्या प्रयत्नात दहा गुण मिळवले. आता सर्वांचे लक्ष अभिषेककडे होते. त्याला सुवर्णपदकासाठी नऊ गुण पुरेसे होते. अर्थात, अभिषेकने याचे दडपण न घेता दहा गुणांचा वेध घेऊन सुवर्णपदक निश्चित केले. जेम्सने आधीच्या लढतीत आपलाच सहकारी निक कॅपेर्सविरुद्ध १५० पैकी १५० गुण मिळवले होते. मात्र, अभिषेकने कुठलेही दडपण न घेता अखेरपर्यंत संयम राखला. विजयानंतर अभिषेक म्हणाला, ‘या पदकाने मी खूप खूश आहे. मला माझे जुने दिवस आठवले. माझा प्रतिस्पर्धी कोण आहे, याचा मी विचार केला नव्हता. मी केवळ लक्ष्य साध्य करण्यावर भर दिला. सर्वोत्तम कामगिरी करण्याचे लक्ष्य ठेवले.’
अभिषेकने २०१४च्या इंचिऑन आशियाई स्पर्धेत कम्पाउंडमध्ये सांघिक सुवर्ण आणि वैयक्तिकमध्ये रौप्यपदक मिळवले आहे. यापूर्वीच्या वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक मिळवले आहेत. त्यामुळे त्याचा अनुभव कोलंबियातील या स्पर्धेत मोलाचा ठरला. अभिषेकला तिरंदाजी वर्ल्ड कपच्या पहिल्या दोन टप्प्यांना मुकावे लागले होते. मात्र, तिसऱ्या टप्प्यात त्याने सुरुवातीपासूनच चमक दाखवली. त्याने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नेदरलँड्सच्या माइक स्क्लोसरवर शूट-ऑफमध्ये मात केली होती. यानंतर अंतिम फेरीत आठव्या मानांकित अभिषेकने ब्राझीलच्या लुकास अब्रेयूचे आव्हान परतवून लावले होते.
[ad_2]