[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
विंडीजविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तीन लढतींत सॅमसनने अनुक्रमे १२, ७ आणि १३ धावा केल्या. या अपयशाने त्याच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. आयर्लंड दौऱ्यावरील सामन्यांत जितेशने छाप पाडली अन् सॅमसनचे स्थान गेले, तर फारसे आश्चर्य वाटणार नाही. जितेश हा अमरावतीचा सुपूत्र. आयपीएलमध्ये तो पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करतो. आशियाई क्रीडा स्पर्धेत २९ वर्षीय जितेशला यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असेल. प्रभसिमरन सिंग हा या संघातील पर्यायी यष्टीरक्षक आहे. जितेशवर जास्त विश्वास असल्यानेच त्याला एशियाडआधी आयर्लंड दौऱ्यावर पाठविण्यात आले आहे. यामुळे जितेशच्या गाठीला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव जमा होऊ शकतो. जितेश हा आयपीएलमध्ये पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस येतो. त्याच्याकडे ‘फिनिशर’ची भूमिका सोपविण्यात येते.
सॅमसनला शेवटची संधी?
आयर्लंड दौऱ्यावर ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल सलामीला येण्याची शक्यता आहे, तर विंडीजमधील चमकदार कामगिरीनंतर तिलक वर्मा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येईल. सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. आयपीएलमध्ये सॅमसनने बऱ्याचदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्यामुळे सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर आजमावता येऊ शकते. आयर्लंड दौऱ्यावरील संघात शिवम दुबेसारखा आक्रमक फलंदाजही आहे. मात्र, अष्टपैलूत्वामध्ये त्याची आणि हार्दिक पंड्याची तुलना होऊ शकत नाही. गोलंदाजीपेक्षा फटकेबाज फलंदाजीच्या कौशल्यामुळे शिवम दुबेला अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकते.
सॅमसनला सगळ्या सामन्यांमध्ये संधी दिलीच, तर रिंकू सिंग आणि जितेश यांच्यापैकी एकाला राखीव खेळाडूच्या भूमिकेत बसावे लागेल.
[ad_2]