पुनावळेचे नाव जागतिक नकाशावर‌ आणणार – शंकर जगताप

कचरा डेपोच्या लढ्याला यश मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले आमदार अश्विनी जगताप यांचे आभार

चिंचवड, ३० ऑक्टोबर -(pragatbharat.com) लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ आणि आमदार अश्विनीताई यांच्या माध्यमातून पुनावळे गावच्या विकासासाठी व गावातील समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या आमदार निधीमधून गावात अनेक विकासकामे वेगाने झाली. पुढील पिढीला आपल्या पुनावळे गावचा अभिमान वाटला पाहिजे, अशा पद्धतीने विकासाचा वेग वाढविण्यात येईल, अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी दिली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष  महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी प्रचारानिमित्त आज पुनावळे गावचा दौरा केला. यावेळी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात नारळ वाढविण्यात आला. त्यानंतर झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत शंकर जगताप बोलत होते.

याप्रसंगी शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, भाजप शहर उपाध्यक्ष राहुल काटे, हुशारआण्णा भुजबळ, रामचंद्र दर्शले, चंद्रकांत दर्शले, अशोक काटे, पोलीस पाटील दिलीप दर्शले, राहुल ढवळे, अजिंक्य गायकवाड, रामदास मदने, तानाजी शिंदे, शंकर गायकवाड, माऊली दर्शले, सुरेश भुजबळ, निवृत्ती भुजबळ, सचिन गायकवाड, अक्षय भुजबळ, चेअरमन पोपट पांढरे, संभाजी शिंदे, संतोष भुजबळ, संभाजी शिंदे, रोशन दर्शले, मंगेश भुजबळ, संभाजी भुजबळ, रोहिदास मदने, राहुल भुजबळ, विलास बोरग, महेंद्र कोयते, कैलास भुजबळ, चिंटू सिंग, दादा ढवळे, सदाशिव गायकवाड, निवृत्ती दर्शले, राजेश भुजबळ, धनंजय कोयते, दिगंबर कोयते, लक्ष्मण कोयते यांच्यासह पुनावळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगताप म्हणाले की, पुनावळे येथे नियोजित कचरा डेपोच्या प्रश्नासंदर्भात मागील १५ वर्षांपासून येथील रहिवाशांचा संघर्ष सुरू होता. लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊंनी हा कचरा डेपो प्रकल्प रद्द व्हावा यासाठी सातत्यपूर्ण राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यासंदर्भात राज्य शासनही गंभीर होते. मात्र भाऊंचे अकाली दुःखद निधन झाले. त्यांच्यानंतर आमदार अश्विनीताईंनी या विषयासंदर्भात विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले. आणि कचरा डेपोचा प्रकल्प रद्द झाला. विशेष म्हणजे या कचरा डेपोच्या जागी आमदार अश्विनीताईंनी ऑक्सिजन पार्क प्रकल्प उभारण्याची मागणी केली. त्यासंदर्भात यशस्वी पाठपुरावा केला. अखेर या प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी मिळाली. त्यासाठी खर्चाची तरतूदही करण्यात आली आहे. या ऑक्सिजन पार्कमुळे पुनावळे गावच्या लौकिकात भर पडणार आहे.

त्याचबरोबर गावातील १२ मीटर आणि १८ मीटर रुंदीचे डी.पी. रस्ते, अंर्तगत रस्त्यांचे डांबरीकरण, पावसाळी पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्टॉर्म वॉटर लाईनची कामे, नागरिकांना रस्त्याने व्यवस्थित चालता यावे यासाठी पदपथ, सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीचे पोल, टी जंक्शन येथे वाहतूक बेटाची निर्मिती आणि सुशोभीकरणाची कामे ही सर्व विकासकामे आमदार स्व. लक्ष्मणभाऊ आणि आमदार अश्विनीताई यांच्या निधीतून आपण केली. तर राम मंदिर परिसरातील सभा मंडप बांधण्याच्या कामालाही मंजुरी मिळालेली आहे. तेही काम लवकरच चालू होईल.पुढील काळात गावातील कोणत्याही शेतकऱ्याचे अथवा ग्रामस्थांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेत पुनावळे गावाच्या विकासाचा आलेख असाच चढता राहील, यासाठी मी देखील स्व. लक्ष्मणभाऊ आणि आमदार अश्विनीताई यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीन, अशी ग्वाही शंकर जगताप यांनी ग्रामस्थांना दिली.

Related posts