[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर या मुंबईकरांनी सातव्या विकेटसाठी झुंजार शतकी भागीदारी केली, पण त्यानंतरही भारतास ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी जगज्जेतेपदाच्या लढतीत शुक्रवारी १७३ धावांच्या पिछाडीस सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी आपला दुसरा डाव कोसळणार नाही याची खबरदारी घेतली. त्यांनी तिसऱ्या दिवसअखेर ४ बाद १२३ अशी मजल मारली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे आता २९६ धावांची भक्कम आघाडी आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस मॅच प्रेजेंटेशन सेरेमनीमध्ये अजिंक्यने धोनीचं तोंडभरुन कौतुक केलं.
अजिंक्य रहाणेचं करिअर संपलं, त्याला आता भारतीय संघात स्थान मिळवणं मुश्किल आहे, अशा चर्चा होऊ लागलेल्या असतानाच अजिंक्यने कसोटी जगज्जेतेपदाच्या लढतीत शानदार खेळी साकारली. या खेळीचं सारं श्रेय त्याने महेंद्रसिंग धोनीला दिलं आहे. अजिंक्य रहाणे म्हणाला, ‘माझ्या या खेळीचं आणि चांगल्या कामगिरीचे श्रेय महेंद्रसिंग धोनीला जाते. त्याने मला चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याची संधी दिली, ज्यामुळे माझा आत्मविश्वास परत आला. त्यामुळे आजच्या खेळीत धोनीचा वाटा आहे’.
‘खडूस मुंबईकरांनी’ भारताची लाज वाचवली!
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या ४६९ धावांसमोर भारताचा पहिला डाव ६ बाद १६२ असा कोलमडला होता. त्यावेळी भारतावर फॉलोऑनच्या नामुष्कीचे सावट होते. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या षटकात श्रीकर भरत बाद झाल्याने ऑस्ट्रेलिया जोषात होते, पण तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियास दुसरे यश लाभणार नाही याची काळजी शार्दूल-अजिंक्यने घेतली, पण उपाहारानंतर ग्रीनच्या चपळाईमुळे रहाणे बाद झाला आणि त्यानंतर भारताचा डाव फारसा लांबणार नाही याची काळजी ऑस्ट्रेलियाने घेतली. दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फारसे सतावणार नाहीत याची काळजी भारतीय गोलंदाजांनी घेतली. मात्र मार्नस लबुशेन आणि स्टीवन स्मिथ यांनी अर्धशतकी भागीदारी करीत ऑस्ट्रेलियास सावरले.
श्रेयस अय्यर, लोकेश राहुलची दुखापत तसेच सुर्यकुमार यादव बहरात नसल्यामुळे अजिंक्य रहाणेची भारतीय संघात निवड झाली. त्यानेच भारतीय डावास आकार दिला. दुसऱ्या दिवशी भारताची ३ बाद ५० अशी अवस्था मैदानात आलेल्या अजिंक्यने जाडेजासह अर्धशतकी आणि शार्दूलसह शतकी भागीदारी केली. तो भारताच्या २६१ धावा असताना तंबूत परतला, पण त्याने त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने आपल्यासाठी रचलेल्या जाळ्यात फसणार नाही याची काळजी घेतली. उंचापुऱ्या ग्रीनने गलीत कमालीची चपळाई दाखवल्यामुळेच रहाणे बाद झाला होता. शार्दूलने मुंबईकरांची झुंजार वृत्ती दाखवत ऑस्ट्रेलियास सतावले.
पहिल्या डावाच्या तुलनेत भारतीयांनी दुसऱ्या डावात चांगली गोलंदाजी केली. त्यांनी पहिल्या डावातील शतकवीर स्मिथ आणि हेड यांना वर्चस्वापासून रोखले. अर्थात लबुशग्ने याने भारतीय गोलंदाजांना पूर्ण वर्चस्वापासून रोखले. अर्थात ऑस्ट्रेलियाने आपली आघाडी तीनशेपर्यंत नेत भारतासमोरील आव्हान खडतर केले आहे.
[ad_2]