[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : आयपीएलचा यंदाचा हंगाम रंगात आला आहे. या स्पर्धेतील साखळी सामने सुरू असून मागील वर्षीप्रमाणेच यावेळीही गुजरातचा संघ दमदार कामगिरी करत असून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज हा संघ आहे. तसंच मोसमाच्या सुरुवातीला सूर न गवसलेल्या मुंबईनेही तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र अद्याप एकाही संघाला पात्रता फेरीत प्रवेश करता आलेला नाही. त्यामुळे सर्वच संघांच्या समर्थकांची धाकधूक वाढली असून ही स्पर्धा रंगतदार स्थिती आली आहे. मात्र अशा स्थितीतच दूरचित्रवाहिनीवर थेट प्रक्षेपण करणाऱ्या ‘स्टार स्पोर्ट्स’वर बंदी घालण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.आयपीएल आणि स्टार स्पोर्ट्स यांचं नातं गेल्या काही वर्षांपासून घट्ट झालं आहे. मागील अनेक हंगामांत स्टार स्पोर्ट्सने आयपीएलचे यशस्वी प्रक्षेपण करत अनेक क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. मात्र, यंदा रिलायन्स उद्योग समूहाच्या जिओ टीव्हीने देखील आयपीएलच्या डिजिटल प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतल्याने स्टार स्पोर्ट्सच्या प्रेक्षकांची संख्या काही अंशी कमी झाली आहे. अशातच शुक्रवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या संघांचा सामना पार पडला. या सामन्याआधी होणाऱ्या प्री-मॅच सोहळ्यात स्टार स्पोर्ट्सकडून वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मुनव्वरसोबत अभिनेते अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर हे देखील उपस्थित होते.
कॉमेडियन मुनव्वर फारुकीला स्टार स्पोर्ट्सने आमंत्रित केल्यामुळे मुन्नवरच्या कामाविषयी आक्षेप असणाऱ्या काही क्रिकेट चाहत्यांनी ‘स्टार स्पोर्ट्स’वर आपला रोष व्यक्त करत या वाहिनीवरच बंदी घालण्याची मागणी केली आहे. ट्विटरवर देखील ‘बॅन स्टार स्पोर्ट्स’ हा हॅशटॅग ट्रेंड करत होता.
दरम्यान, हिंदू धर्मियांच्या देव देवतांवर टीका केल्याचा आरोप करत मुनव्वर फारुकी याच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर फारुकीला अटकही झाली होती.
[ad_2]