[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
आधी ठरल्याप्रमाणे ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती. मात्र, भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही भारतातील वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार नसल्याची धमकी दिली होती. हा वाद वाढत गेला होता. गेल्या महिन्याभरापासून यावर खल सुरू होता. अखेर गेल्या आठवड्यात एसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ‘हायब्रीड मॉडेल’ला हिरवा कंदील दाखविला. यानुसार स्पर्धेचे यजमान पाकिस्तान राहील; पण भारताचे सामने पाकिस्तानात होणार नाहीत. हा प्रस्ताव अखेर शहा यांनी मान्य केला. त्यानुसार आता भारत-पाकिस्तानमधील लढती श्रीलंकेत होतील. या स्पर्धेत एकूण १३ वन-डे लढती खेळल्या जातील. अर्थात, अंतिम वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. एकूण सहा संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत, ही माहिती एसीसीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
आशिया कपला खेळण्यास भारताने होकार दिल्याने पाकिस्तान संघही आता वर्ल्ड कपसाठी भारतात येणार हे निश्चित झाले आहे. भारत-पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या मोदी स्टेडियममध्ये आमनेसामने येण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे जिऑफ ॲलर्डिक आणि अध्यक्ष ग्रेग बारक्ले यांनी कराचीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांची भेट घेतली होती. त्यात वर्ल्ड कप आणि आशिया कपवर चर्चा झाली. त्यामुळे आता २००८नंतर ही स्पर्धा प्रथमच पाकिस्तानमध्ये होणार आहे. ‘भारत-पाकिस्तानचे सामने पाकिस्तानमध्ये व्हावेत, अशी आमची खूप इच्छा होती. आमच्या चाहत्यांनाही भारताला पाकिस्तानात खेळताना बघायचे होते. मात्र, दोन्ही देशांतील राजकीय संबंध लक्षात घेता दोन्ही बोर्डांना हे शक्य नाही. अर्थात, चाहत्यांना या स्पर्धेत भारत-पाकिस्तानचे सामने बघायला मिळणार आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. आता आम्हाला स्पर्धेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे,’ असे सेठी यांनी सांगितले.
अमीरातीचा प्रस्ताव फेटाळला
सुरुवातीला भारताने ही स्पर्धा पाकिस्तानात न घेता संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) घेण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, अमीरातीमधील स्पर्धेला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने विरोध केला. ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्या काळात अमीरातीमध्ये प्रचंड उन्हाळा असेल, असे कारण बांगलादेशने दिले होते. याआधी १९८४, १९९५, २०१८, २०२२ची स्पर्धा यूएईत झाली आहे. गेल्या वर्षी ही स्पर्धा टी-२० स्वरूपात खेळली गेली आणि श्रीलंकेने पाकिस्तानला नमवून विजेतेपद पटकावले होते. भारताला सुपर-४मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान लढत होऊ शकली नव्हती.
अशी होणार स्पर्धा
– सहा संघांची दोन गटांत विभागणी
– ‘अ’ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ,
‘ब’ गटात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेला स्थान
– गटातील दोन संघ सुपर-४मध्ये दाखल होतील.
– सुपर-४मधील अव्वल दोन संघांमध्ये अंतिम लढत
– या ‘फॉरमॅट’नुसार भारत-पाकिस्तान किमान दोन वेळा आमनेसामने येतील
– दोन्ही संघ अंतिम फेरीत दाखल झाल्यास एकूण तीन वेळा भारत-पाकिस्तान क्रिकेटचा थरार
स्पर्धा कधी : ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर
सामने किती : १३ वन-डे लढती
सामने कुठे : पाकिस्तानमधील चार सामने लाहोरमध्ये, तर श्रीलंकेतील नऊ सामने कँडी, पल्लीकलमध्ये होणार आहेत.
सहभागी देश : ६ (भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ)
विजेते : भारताने ही स्पर्धा सात वेळा, तर श्रीलंकेने सहा वेळा जिंकली आहे. पाक दोन वेळा विजेता आहे.)
बुमराह-अय्यर खेळणार
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या दोघांवर नुकत्याच शस्त्रक्रिया झाल्या आहेत. बुमराहवर मार्चमध्ये, तर अय्यरवर मे महिन्यात शस्त्रक्रिया झाली आहे. त्यातून सावरून ते आशिया कपमध्ये खेळण्याची शक्यता आहे. दरम्यान, यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतवरही अकादमीतच उपचार सुरू आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये कार अपघातात तो जबर जखमी झाला होता. वर्ल्ड कपच्या आधी तंदुरुस्त होण्याचे लक्ष्य पंतने बाळगले आहे.
[ad_2]