उद्योगपती, समाजसेवी उद्योग रतन टाटा पंचतत्त्वात विलीन  

मुंबई (pragatbharat.com): भारत देशाचे उद्योगपती, समाजसेवी रतन टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.नोएल टाटा यांसह कुटुंबातील अन्य सदस्य, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर, तसेच टाटा उद्योग समूहातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, पारशी परंपरेनुसार विधी पार पडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आदींनी टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. परवा रात्री उशिरा रतन टाटा यांनी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. टाटा यांचे पार्थिव दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए॒) येथे काल सकाळी साडेदहा ते दुपारी चार या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राज ठाकरे, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, एल अँड टीचे प्रमुख एस.एन. सुब्रमण्यन, सचिन तेंडुलकर यांसह उद्योग जगत, राजकीय, शैक्षणिक, चित्रपट, क्रीडासह विविध क्षेत्रांतील मंडळींनी टाटा यांचे अंतिम दर्शन घेतले. आमीर खान, किरण राव, दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि अभिनेता राजपाल यादव यांनीही टाटा यांना आदरांजली वाहिली. टाटा उद्योग समूहातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनीदेखील यावेळी अलोट गर्दी केली होती. 

Related posts