[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
जागतिक क्रमवारीत भारत १००व्या, तर लेबनॉन १०२व्या क्रमांकावर आहे. या संघांतील गेल्या आठपैकी दोन लढतींत भारतीय संघाने, तर तीन लढतींत लेबनॉनने बाजी मारली आहे. तसेच, तीन लढती बरोबरीत सुटल्या होत्या. साहजिकच विजय नोंदवून अंतिम फेरी गाठण्यासाठी यजमान भारतीय संघ उत्सुक होता. दोन्ही संघांनी गोल नोंदवण्याच्या संधी निर्माण केल्या. मात्र, त्यावर गोल करण्यात अपयश आल्याने, निर्धारित वेळेअखेर गोलशून्य बरोबरी कायम होती. त्यानंतर अतिरिक्त वेळेअखेरही गोलशून्य बरोबरी कायम राहिली. त्यामुळे शूटआउटचा अवलंब करण्यात आला. शूटआउटमध्ये पहिल्याच प्रयत्नात कर्णधार सुनील छेत्रीने अचूक गोल केला. गुरप्रीतसिंग संधूने लेबनॉनचा कर्णधार मातौक याची किक रोखून भारतास छान सुरुवात करून दिली. त्यानंतर अन्वर अली, महेश आणि उदांता यांनी गोल करीत भारतास ४-२ असे आघाडीवर नेले. वालिद शौर आणि मोहम्मद सादेक यांनी या वेळी लेबनॉनकडून गोल केले होते. लेबनॉनचे आव्हान राखण्यासाठी खलील बादेरने संघाच्या चौथ्या प्रयत्नात गोल करणे आवश्यक होते. बादेरच्या किकवर चेंडू गोलपोस्टपासून दूरच गेला आणि भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केला.
भारताचा बचावात्मक खेळ चांगलाच उंचावला आहे. त्यामुळे आक्रमण प्रभावी नसल्याचा फटका भारतास निर्धारीत जादा वेळेत बसला नाही. या एकूण १२० मिनिटांत गोलफलक कोरा ठेवल्यामुळे भारतीयांचा आत्मविश्वास उंचावला होता. त्यामुळेच शूटआउट जिंकण्यात यश आले.
भारताच्या विजयात गुरप्रीतचे गोलरक्षण निर्णायक ठरले. त्याने निर्धारीत वेळेत किमान तीनदा लेबनॉनला गोलपासून रोखले होते. आता भारताची कुवेतविरुद्ध अंतिम फेरीत लढत होईल. या दोनसंघातील गटसाखळीतील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली होती.
भारताने सामना जिंकल्यावर सामन्याच्यावेळी स्टँडमध्ये असलेल्या इगॉर स्तिमॅक यांच्यासह सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांत चढाओढ झाली. चाहत्यांचे समाधान केल्यावर स्तिमॅक मैदानात धावत आले. त्यांनी बदली मार्गदर्शक महेश गवळी यांना अलिंगन दिले. या स्पर्धेत सलग नवव्यांदा भारताने अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत केवळ २००३ मध्येच भारताला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले होते. पण त्यानंतर मात्र भारताने सातत्यपूर्ण कामगिरी केली.
[ad_2]