[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी आज, गुरुवारी रंगणारी आयपीएल टी-२० स्पर्धेतील लढत सत्त्वपरीक्षेसारखी असेल. ‘प्लेऑफ’ प्रवेशासाठी त्यांना सनरायझर्स हैदराबादला त्यांच्याच मैदानावर हरवावे लागेल. त्या दृष्टिकोनातून विराट कोहलीच्या कामगिरीवर नजरा असतील. बेंगळुरूच्या खात्यात सध्या १२ गुण असून उर्वरित दोन सामने त्यांना जिंकावेच लागतील.
बेंगळुरूसाठी जमेची बाब म्हणजे त्यांनी गेल्या सामन्यांत राजस्थान रॉयल्सचा ११२ धावांनी फडशा पाडला होता. डूप्लेसिस आणि मॅक्सवेलच्या अर्धशतकांमुळे बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७१ धावा केल्या. तर वेन पार्नेल (१०/३), मायकेल ब्रेसवेल (१६/२), कर्ण शर्मा (१९/२) आणि मोहम्मद सिराज (१०/१) यांच्या प्रभावी माऱ्यामुळे राजस्थानला ५९ धावांतच गुंडाळले. मुख्य म्हणजे हा विजय बेंगळुरूला मुंबई आणि दिल्लीविरुद्धच्या लागोपाठच्या पराभवांनंतर मिळालेला.
हैदराबादसाठी मात्र ही अस्तित्वाची लढाई असेल. उर्वरित लढती जिंकून आपल्या पाठिराख्यांना आनंद साजरा करण्याचे निमित्त त्यांना मिळवून देता येईल. यंदा संपूर्ण मोसमात फलंदाजी, गोलंदाजी अशा दोन प्रमुख मुद्यांवर हैदराबाद अपयशीच ठरला. हेन्रिच क्लासेन आणि काही अंशी राहुल त्रिपाठी यांचा अपवाद वगळता हैदराबादकडून फलंदाज चमकले नाहीत. कर्णधार एडन मार्करमची बॅट तळपलीच नाही. हॅरी ब्रूकने सुरुवातीला चुणूक दाखवली, पण तोही थंडावला. तर मयंक अगरवालची कामगिरी इतकी खालावली की त्याची दखलही घ्यावीशी वाटली नाही. गोलंदाजीत हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने १२ सामन्यांत १४ मोहरे टिपले, पण संघाला जिंकून देणारी कामगिरी मात्र त्याच्याकडून झाली नाही. मयंक मार्कंडेनेही (१० सामन्यांत १२ विकेट) बरी कामगिरी केली; पण मार्को जॅनसेन, टी नटराजन आणि उम्रान मलिकचे फॉर्मात नसण्याचा फटका हैदराबादला बसला.
[ad_2]