[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
निवृत्ती घेतल्याने यंदा सानिया मिर्झाचे योगदान नसेल. अंकिता संघातील अनुभवी महिला खेळाडू आहे. ‘गेल्या एशियाडप्रमाणे यंदाही चीनकडून कडवे आव्हान असेल. थायलंड, जपान, कझाकिस्तानचे टेनिसपटूही चाणाक्ष आहेच. मात्र या देशांच्या खेळाडूंविरुद्ध मी आणि माझे इतर सहकारी खेळले आहेत. आम्ही त्यांचा खेळ जाणून आहोत’, असे अंकिताचे म्हणणे आहे. ‘आशियाई क्रीडा स्पर्धांत भारतीय टेनिसपटूंनी कायमच चांगली कामगिरी केली आहे. मी तर म्हणेन की, आम्हा टेनिसपटूंच्या नियमीत होणाऱ्या स्पर्धांपेक्षा एशियाड किंवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचा माहोल स्फूर्तीदायक असतो’, एशियाड, ऑलिम्पिकविषयी अंकिता आस्थेने बोलते.
एशियाडच्या टेनिस दुहेरीत अंकिता ही ऋतुजा भोसलेसह खेळेल, असा सध्याचा अंदाज असला तरी अंकिता मात्र प्रार्थना ठोंबरेचाही आवर्जून उल्लेख करते. मात्र नेमके कुणासह खेळणार याचे उत्तर देणे तिने टाळले. ‘मी दुहेरीत ऋतुजा आणि प्रार्थना या दोघींसह खेळले आहे. प्रार्थनालाही एशियाड आणि ऑलिम्पिकचा अनुभव आहेच. गेल्यावर्षीही मी ऋतुजा आणि प्रार्थना या दोघींसह दुहेरी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. दोघींसह माझा समन्वय आहे’, अंकिता उत्तरास बगल देते. एशियाडआधी संधी मिळाल्यास पूर्वतयारी म्हणून या दोघींसह खेळण्याचा तिचा प्रयत्न असेल.
टेनिससाठी पुण्यात येण्याचा निर्णय योग्यच
‘टेनिसमध्ये कारकीर्द घडविण्यासाठी पुण्यात येऊन राहण्याचा माझा निर्णय योग्यच होता’, भारताची अव्वल टेनिसपटू अंकिता रैना ठामपणे सांगते. विम्बल्डन अंतिम फेरीच्या निमित्ताने ऑल इंग्लंड क्लबने मुंबईत मोठ्या पडद्यावर स्पर्धेच्या अंतिम फेरींचे आयोजन केले अन् त्यावेळी पुण्यात सराव करणाऱ्या अंकिताची विशेष उपस्थिती होती. यावेळी तिने ‘मटा’शी खास संवाद साधला.
‘मी आजवर जे काही यश मिळवले, इथवर आले आहे त्यात अनेकांच्या मदतीचा, मार्गदर्शनाचा वाटा आहे. यात अर्थातच पुण्याचा उल्लेख आवर्जून करेन. एक, दोनवेळा टेनिस सरावासाठी माझे स्पेनला जाणे झाले; पण नशिबाने मला हेमंत बेंद्रे सरांसारखा प्रशिक्षक लाभला. त्यांच्या अकादमीत येणे आणि त्यासाठी पुण्यात राहणे हा निर्णय माझ्या पालकांनी घेतला. जो अगदी योग्य आहे’, अंकिता ठामपणे सांगते
मार्गदर्शनासाठी परदेशात जाणे, मुळातच रैना कुटुंबियांना न पटणारे आहे. ‘कारकिर्दीला जो आकार मिळेल, दिशा ठरेल ती मायदेशातूनच, असे आम्ही रैना कुटुंबिय मानतो. आपल्याकडेही टेनिसचे चांगले मार्गदर्शक आहेत. मग बाहेर कशाला जायचे? भारतात राहूनच मी यशस्वी टेनिसपटू होऊ शकतेच’, असे अंकिता मनापासून म्हणते.
[ad_2]