[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पाकिस्तानने १४ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात इंधन दरवाढीचा फटका बसला. बुधवारपासून लागू झालेल्या पेट्रोलच्या नव्या किमती पाहिल्यास, वित्त विभागाच्या अधिसूचनेनुसार प्रति लीटर १७.५० पाकिस्तानी रुपयांची लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील पेट्रोलचे नवे दर २९०.४५ पाकिस्तानी रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.
एक पाकिस्तानी रुपया म्हणजे भारतीय चलनानुसार २८ पैसे. त्यामुळे १७.५० पाकिस्तानी रुपयांची वाढ म्हणजे ४.८९ भारतीय रुपये. तर एकूण दर २९०.४५ पाकिस्तानी रुपये म्हणजे ८१.२२ भारतीय रुपये इतके होतात.
हाय-स्पीड डिझेलच्या दरांमध्ये आणखी वाढ होईल. त्याची किंमत २० पाकिस्तानी रुपयांनी वाढून २९३.४० पाक रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचेल.
सोमवारी शपथविधी झालेले काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांच्या मंजुरीनंतर अर्थ मंत्रालयाने रात्री उशिरा सुधारित किमती जाहीर केल्या. गेल्या दोन आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय पेट्रोलियमच्या किमतीत झालेल्या वाढीचे कारण देत, वित्त विभागाने या प्रमुख इंधनांच्या किमती वाढवण्याचे समर्थन केले.
सरकारच्या अधिसूचनेत रॉकेल आणि लाईट डिझेल तेलाच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियमच्या किमतीतील ही अलिकडील वाढ मागील सरकारने एक ऑगस्ट रोजी लादलेल्या दरवाढी प्रमाणेच आहे. परिणामी, इंधनाच्या किमती केवळ १५ दिवसांच्या कालावधीत सुमारे प्रति लिटर ४० पाकिस्तानी रुपयांनी वाढल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (IMF) करार असूनही, वाढत्या राजकीय अनिश्चिततेमुळे पाकिस्तानची आर्थिक घसरण अजूनही सुरूच आहे. शेहबाज शरीफ यांनी काळजीवाहू सरकारकडे सत्ता सोपवली असली तरी निवडणुकीच्या तारखांबाबत अद्याप स्पष्टता नाही. तुरुंगात शिक्षा भोगत असलेले आणि निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या भवितव्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
[ad_2]