[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पणजी ; ट्रॅक सायकलिंग, ट्रायथलॉन, टेनिस, तिरंदाजी आणि स्क्वॉश क्रीडा प्रकारांमधील शानदार कामगिरीमुळे महाराष्ट्र रविवारी ११व्या दिवशी पदकतालिकेत द्विशतकाच्या उंबरठ्यावर आहे. ६७ सुवर्ण, ६१ रौप्य आणि ६५ कांस्यपदकांसह एकूण १९३ पदके जिंकत महाराष्ट्राने पदकतालिकेतील अग्रस्थानावर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. सेनादल (५२ सुवर्ण, २२ रौप्य, २८ कांस्य, एकूण १०२ पदके) दुसऱ्या आणि हरयाणा सेनादल (४८ सुवर्ण, ३३ रौप्य, ४७ कांस्य, एकूण १२८ पदके) तिसऱ्या स्थानावर आहेत. ट्रॅक सायकलिंगच्या अखेरच्या दिवशीसुद्धा महाराष्ट्राच्या मयुरी लुटेने सोनेरी यश मिळवून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पाचव्या पदकाला गवसणी घातली. महाराष्ट्राने रविवारी एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण तीन पदके कमावली. ट्रायथलॉनमध्ये महाराष्ट्राच्या मानसी मोहितेने सुवर्णपदकाला गवसणी घातली. याचप्रमाणे संजना जोशीने रौप्यपदक जिंकले. ट्रायथलॉनमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने दोन पदके पटकावली. आंतरराष्ट्रीय टेनिसपटू अर्जुन कढे आणि ऋतुजा भोसले जोडीने आपल्या दर्जाला साजेसा खेळ करीत रविवारी महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मिश्र दुहेरी टेनिसचे सुवर्णपदक मिळवून दिले. महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी रविवारी कंपाऊंड प्रकारात एक रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण तीन पदकांची कमाई केली. यात पार्थ कोरडेचे वैयक्तिक कांस्य आणि सांघिक रौप्य अशी दोन पदके मिळवली. एक कांस्य महिला संघाने पटकावले. स्क्वॉश क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या उर्वशी जोशी आणि राहुल बैठा यांना एकेरीची कांस्यपदके मिळाली.
हॉकीमध्ये प्रियांका वानखेडेच्या दुहेरी गोलच्या बळावर महाराष्ट्राच्या महिला संघाने अखेरच्या साखळी सामन्यात कर्नाटकवर ३-१ असा शानदार विजय मिळवला. पण महाराष्ट्राच्या संघाला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. नेमबाजीत रुचिरा विणेरकर आणि साक्षी सूर्यवंशी यांना चार गुणांच्या फरकाने महिला १० मीटर एअर रायफल प्रकाराची अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी पुरुष आणि महिला दोन्ही संघानी सलग दुसरे दिमाखदार विजय संपादन केले. कबड्डीत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने सलग दुसऱ्या विजयानिशी बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. राजस्थानने बरोबरीत रोखल्यामुळे महिला संघ मात्र साखळीतच गारद होण्याची शक्यता आहे. बॉक्सिंगमध्ये ऋषीकेश गौडने पांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.
सायकलिंग – मयुरीला सोनेरी यश; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पाचवे पदक
महाराष्ट्राच्या मयुरी लुटेने ट्रॅक सायकलिंगच्या अखेरच्या दिवशीसुद्धा सोनेरी यश मिळवून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पाचव्या पदकाला गवसणी घातली. महाराष्ट्राने रविवारी एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण तीन पदके कमावली. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या ट्रॅक सायकलिंगच्या महिलांच्या केरीन गटात मयुरीने पहिला क्रमांक पटकावला. तर रौप्यपदकही महाराष्ट्राच्याच सुशिकला आगाशेने मिळवले. कांस्यपदक दिल्लीच्या त्रियंशा पॉलला मिळाले. पुरुषांच्या केरीन गटात मयूरने तिसरा क्रमांक मिळवला. अंदमान आणि निकोबारच्या डेव्हिड बेकहॅमने सुवर्ण आणि मणिपूरच्या यांगलेम सिंगणे रौप्य पदक पटकावले. ट्रॅक सायकलिंगमध्ये महाराष्ट्राने तीन सुवर्ण, तीन रौप्य, दोन कांस्य अशी एकूण आठ पदके प्राप्त केली. यात मयुरीने यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण पाच पदके मिळवली आहेत.
शेतकऱ्याच्या कन्येचे ट्रक सायकलिंगमध्ये पंचतारांकित यश
नागपूरच्या भंडारा जिल्ह्यातील बेला गावची शेतकरी कन्या मयुरी लुटेने ट्रक सायकलिंगमध्ये पंचतारांकित यश मिळवून महाराष्ट्राच्या यशात सिंहाचा वाटा उचलला आहे. या २२ वर्षीय कन्येचे राज्यात कौतुक होत आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पाच पदके मिळवल्याचा मला अतिशय आनंद झाला आहे, अशी भावना मयुरीने व्यक्त केली. मयुरीने यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण पाच पदके मिळवली आहेत. मयुरीने ट्रक सायकलिंगचे प्राथमिक धडे पुण्यात दीपाली पाटील यांच्याकडे गिरवले. मग २०१५पासून दिल्लीमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षण आणि सराव सुरू केला. कला शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती सध्या हुबळी बिजापूर येथे दक्षिण-पश्चिम रेल्वेत कार्यरत आहे. “यश मिळाले तरी मी समाधानी नाही. कामगिरीत आणखी सुधारणा करायची आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचे आणि पदक जिंकण्याचे माझे स्वप्न स्वप्न आहे,” असे मयुरीने सांगितले. मयुरीने यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण पाच पदके मिळवली आहेत.
ट्रायथलॉन – माशाने चावा घेऊनही मानसी मोहितेची सुवर्णपदकाला गवसणी
कधीही हार मानू नये ही वृत्ती ठेवली तर यश निश्चितपणे मिळते असे आपण नेहमी म्हणत असतो. याचाच प्रत्यय घडवत महाराष्ट्राच्या मानसी मोहितेने ट्रायथलॉनमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. याचप्रमाणे संजना जोशीने रौप्यपदक जिंकले. ट्रायथलॉनमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने दोन पदके पटकावली. ट्रायथलॉनमध्ये पोहताना जेली फिशने तिच्या पायाच्या चावा घेतला. मात्र तरीही तिने पोहणे, सायकलिंग आणि धावणे अशा तिन्ही शर्यती यशस्वीपणे पूर्ण करीत महाराष्ट्राला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिले. या स्पर्धेत तिची सहकारी संजना जोशी ही रौप्यपदकाची मानकरी ठरली. पणजी येथील समुद्रकिनारी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ७५० मीटर्स पोहणे, त्यानंतर २० किलोमीटर सायकलिंग व नंतर पाच किलोमीटर धावणे अशा शर्यतींचा त्यामध्ये समावेश होता. पोहत असतानाच मानसीच्या पायांना जेली फिश चावले. मात्र हे होऊनही या वेदना सहन करीत तिने ७५० मीटर्स पोहणे शर्यत १३ मिनिटे, १४ सेकंदात, त्यानंतर २० किलोमीटर सायकलिंग ३६ मिनिटे ४४ सेकंदात व नंतर पाच किलोमीटर धावण्याची शर्यत २२ मिनिटे २८ सेकंदात पूर्ण केली आणि सुवर्णपदक जिंकले. संजनाने ७५० मीटर्स पोहणे शर्यत १३ मिनिटे, ०९ सेकंदात, त्यानंतर २० किलोमीटर सायकलिंग ३५ मिनिटे ५४ सेकंदात व नंतर पाच किलोमीटर धावणे शर्यत २६ मिनिटे १४ सेकंदात पूर्ण केली आणि रुपेरी कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये गुजरातच्या प्रज्ञा कुमारीला अगोदर रौप्यपदक जाहीर करण्यात आले होते. मात्र सायकलींच्या वेळी तिचे पॅडल निघाल्यानंतर तिने स्वतः ते बसवण्याऐवजी वडिलांनी तिला ते बसवून दिले. सायकलीचा कुठलाही भाग तुटला तर तो पुन्हा बसवण्याची जबाबदारी संबंधित खेळाडूचीच असते. या संदर्भात महाराष्ट्रसह तीन-चार संघांनी आक्षेप घेतला आणि त्यांचा हा आक्षेप मान्य करण्यात आला. त्यामुळे प्रज्ञाला अपात्र ठरवण्यात आले आणि संजनाला रौप्यपदक बहाल करण्यात आले. मानसीला ही स्पर्धा झाल्यानंतर येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मानसी ही पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू असून तिने आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये भरघोस पदके मिळवली आहेत.
टेनिस – अर्जुन-ऋतुजाला मिश्र दुहेरी सुवर्णपदक
आंतरराष्ट्रीय टेनिसपटू अर्जुन कढे आणि ऋतुजा भोसले जोडीने आपल्या दर्जाला साजेसा खेळ करीत रविवारी महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मिश्र दुहेरी टेनिसचे सुवर्णपदक मिळवून दिले. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात अर्जुन-ऋतुजा जोडीने तामिळनाडूच्या जीवन एन आणि साईसमिताचा ६-३, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थ रावतने आणि महिला एकेरीत गुजरातच्या वैदेही चौधरीने सुवर्णपदक प्राप्त केले. महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण, एक रौप्य, एक कांस्य अशी एकूण पाच पदकांची कमाई केली आहे. ऋतुजाने सांघिक रौप्यपदक आणि महिला दुहेरीचे सुवर्णपदक आधी जिंकल्यामुळे हे तिचे यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिसरे पदक ठरले. याचप्रमाणे अर्जुनने शनिवारी पूरव राजाच्या साथीने पुरुष दुहेरीचे पदक जिंकले होते. त्यामुळे त्याचे हे दुसरे पदक ठरले.
तिरंदाजी – कंपाऊंड प्रकारात तीन पदके
महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी रविवारी कंपाऊंड प्रकारात एक रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण तीन पदकांची कमाई केली. यात पार्थ कोरडेचे वैयक्तिक कांस्य आणि सांघिक रौप्य अशी दोन पदके मिळवली. एक कांस्य महिला संघाने पटकावले. सांघिक पुरुष प्रकारात पार्थ, मानव जाधव, प्रथमेश जावकर आणि हर्ष बोराटे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने २२४ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. दिल्लीने २२८ गुण मिळवून सुवर्ण आणि राजस्थानने २३१ गुण मिळवून कांस्यपदक मिळवले. पार्थने वैयक्तिक प्रकारात १४३ गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. दिल्लीच्या ऋतिक चहलने (१४९ गुण) सुवर्ण आणि राजस्थानच्या रजत चौहानने (१४५ गुण) कांस्यपदक मिळवले. महिला सांघिक प्रकारात महाराष्ट्राने २२६ गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. महाराष्ट्राच्या संघात पूर्वशा शेंडे, तेजल साळवे, मामंगावकर, पृथिका सीमॉन यांचा समावेश होता. राजस्थानने २२८ गुण मिळवून सुवर्ण आणि पंजाबने २२६ गुण मिळवून कांस्यपदक मिळवले.
उर्वशी जोशी, राहुल बैठा यांना कांस्यपदके
महाराष्ट्राच्या उर्वशी जोशी आणि राहुल बैठा यांना स्क्वॉश क्रीडा प्रकारात एकेरीची कांस्यपदके मिळाली. महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात उर्वशीने गोव्याच्या आकांक्षा साळुंखेकडून ७-११, ९-११, १-११ असा पराभव पत्करला. पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात राहुलचा तमिळनाडूच्या अभय सिंगकडून ६-११, १-११, ८-११ अशी हार पत्करली.
हॉकी -प्रियांकाच्या दुहेरी गोलमुळे महाराष्ट्राच्या महिला संघाचा कर्नाटकवर शानदार विजय
प्रियांका वानखेडेच्या दुहेरी गोलच्या बळावर महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात कर्नाटकवर ३-१ असा शानदार विजय मिळवला. पण महाराष्ट्राच्या संघाला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. या सामन्यात पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटले. मग दुसऱ्या सत्रात २७व्या मिनिटाला प्रियांकाने महाराष्ट्राचा पहिला गोल साकारला. पण पुढच्याच मिनिटाला कर्नाटकच्या निशा पी सी हिने (२८व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत मध्यंतराला १-१ अशी बरोबरी साधली. मग तिसऱ्या सत्रातही दोन्ही संघांना गोल नोंदवण्यात अपयश आले. चौथ्या सत्रात मात्र महाराष्ट्राने आव्हान टिकवण्यासाठी आक्रमक खेळ केला. ५३व्या मिनिटाला प्रियांकाने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत महाराष्ट्राची आघाडी २-१ अशी वाढवली. मग दोन मिनिटांनी लालरिंडिकीने (५५व्या मिनिटाला) मैदानी गोल करीत महाराष्ट्राच्या खात्यावर तिसरा गोल जमा केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या भावना खाडेला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. ब-गटातून झारखंड (१० गुण) आणि पंजाब (७ गुण) यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले. महाराष्ट्रानेही ७ गुण कमावले. पण गोलफरकामध्ये पंजाबने आगेकूच केली.
खो-खो – महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचे दिमाखदार विजय
महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी पुरुष आणि महिला दोन्ही संघानी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गटातील सलग दुसरे दिमाखदार विजय संपादन केले. पुरुष गटात महाराष्ट्राने पश्चिम बंगालचा ६०-२२ असा ३८ गुणांनी दणदणीत पराभव केला. तर महिला गटात महाराष्ट्राने केरळवर ६२-२६ असा ३६ गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. फोंडा मल्टीपर्पज स्टेडियमवर सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने पश्चिम बंगालवर दणदणीत विजय मिळवताना कर्णधार रामजी कश्यपने २.२० मी. संरक्षण करत १० गडी बाद केले. फर्जंद पठाणने २.०० मी. संरक्षण करत ८ गडी टिपले. आदित्य गणपुलेने २.३० मी. पळतीचा खेळ करून २ गडी बाद केला, तर सुयश गरगटेने नाबाद १.२० मी. संरक्षण करून ४ गडी बाद केले. केरळ संघाकडून मूर्तजा अलीने एकतर्फी लढत देत १.४० मी. संरक्षण करून महाराष्ट्राचे ४ गडी बाद केले.
अपेक्षेप्रमाणे महिला गटातील महाराष्ट्राचा केरळविरुद्धचा सामना एकतर्फी झाला. या सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघाने तब्बल ३६ गुणाने विजय नोंदवला. या यशात अष्टपैलू खेळाडू प्रियंका इंगळे हिचा मोलाचा वाटा ठरला. तिने १.४० मी. संरक्षण करून आपल्या धारधार आक्रमणाने १२ गुण मिळवले. रेश्मा राठोडने १.५० मी. संरक्षण करताना ८ गुण मिळवले. प्रियांका भोपीने २.४० मी. पळतीचा खेळ करत आक्रमणामध्ये ४ गुण मिळवले. प्रिथा एस.ने १.२० मी. संरक्षण करत महाराष्ट्राचे ८ गुण मिळवले. तर के. आर्याने १.५० मी. संरक्षण करताना ४ गुण मिळवण्यात यश मिळवले. काल गटातील ओडिसाबरोबर पहिला सामना गमावणाऱ्या केरळ पुरुष संघाने आज कर्नाटकवर ४८-४२ असा ६ गुणांनी विजय मिळवत आपले आव्हान कायम राखले आहे. गटातील पहिला सामना जिंकणाऱ्या दिल्ली महिला संघाला आज मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. कर्नाटक संघाने दिल्ली महिला संघावर ५०-३२ असा १८ गुणांनी विजय संपादन केला.
कबड्डी – महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा दुसऱ्या विजयासह बाद फेरीतील प्रवेश निश्चित
महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघाने रविवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत साखळीतील सलग दुसऱ्या विजयानिशी बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. राजस्थानने बरोबरीत रोखल्यामुळे महिला संघ मात्र साखळीतच गारद होण्याची शक्यता आहे.
पुरुष गटातील अ-गटाच्या सामन्यात महाराष्ट्राने तमिळनाडूला ४४-२१ असे पराभूत केले. नैसर्गिक खेळ करीत पहिल्या सत्रात २४-११ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रात तमिळनाडूने आक्रमकतेने भर देत महाराष्ट्राचे चार गडी एक एक करून टिपले. शेवटचे ३गडी शिल्लक असताना तामिळनाडूला महाराष्ट्रावर लोण देण्याची संधी होती. पण किरण मगरने अव्वल पकड करीत त्यांचा बेत हाणून पाडला. त्यानंतर महाराष्ट्राने तो लोण तामिळनाडूवर देत महाराष्ट्राची आघाडी वाढवली.
शेवटची ५ मिनिटे पुकारली, तेव्हा ४१-१७ अशी आघाडी घेत महाराष्ट्राने आधीच सामना खिशात टाकला होता. आकाश शिंदे, तेजस पाटील, आदित्य शिंदे यांच्या झंझावाती चढाया त्यांना अरकम शेख, किरण मगर यांची मिळालेली बचावाची भक्कम साथ यामुळे महाराष्ट्राने मोठ्या फरकाने विजय मिळविता आला. दुसऱ्या सत्रात अक्षय भोइरला खेळण्याची संधी देण्यात आली. त्याने देखील अष्टपैलू खेळ करीत मिळालेल्या संधीचे सोने केले. महाराष्ट्राचा शेवटचा साखळी सामना चंदीगडशी होईल.
महाराष्ट्राच्या महिला संघाला ब-गट साखळी सामन्यात राजस्थानविरुद्ध ३०-३० अशा बरोबरीने साखळीतच गारद होण्याची भीती निर्माण झाली. सुरुवात झकास करीत महाराष्ट्राच्या महिलांनी पूर्वार्धात १८-१२ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात शेवटच्या काही मिनिटात लोण देत महाराष्ट्राने २७-१६ अशी आघाडी वाढवली. पण शेवटच्या ३ मिनिटात राजस्थानने जोरदार प्रतिहल्ला करीत बरोबरी साधण्यात यश मिळवले. शेवटच्या क्षणी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राजस्थानला नाहक गुण बहाल केले. महाराष्ट्राकडून रेखा सावंत पकडीत, तर हराजित कौर चढाईत बरी खेळली.
बॉक्सिंग -ऋषीकेश उपांत्य फेरीत; महाराष्ट्राचे पदक निश्चित
महाराष्ट्राच्या युवा बाॅक्सर ऋषीकेश गाैडने सर्वाेत्तम कामगिरी करीत रविवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. त्यामुळे महाराष्ट्र संघाचे पदकही निश्चित झाले आहे.
ऋषीकेशने ५४ ते ५७ किलाे वजन गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत गाेव्याच्या प्रल्हाद पांडा या खेळाडूवर ४-१ ने मात केली. यासह त्याला अंतिम चारमधील प्रवेश निश्चित करता आला. दरम्यान, महाराष्ट्राच्या साैरभ लेणेकर यालाही पराभवाचा सामना करावा लागला. सेनादलाच्या एस.पोखारिया याने त्यांच्यावर मात केली. महिला गटात जान्हवी वाघमारे आणि विधी रावळ यांनाही आपापल्या गटात पराभवाला सामाेरे जावे लागले. यामुळे त्यांचे पदकाचे स्वप्न भंगले.
[ad_2]