अभिनयाबरोबरच आता श्रेया बुगडे ‘या’ क्षेत्रात आजमावणार नशीब

( प्रगत भारत । pragatbharat.com)

‘कॉमेडी क्वीन’ म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडेला ओळखले जाते. ती मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तिला खरी ओळख मिळाली. उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत ती प्रेक्षकांना खळखळवून हसवते. आता श्रेया बुगडेने तिच्या चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. 

गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक कलाकार हे विविध व्यवसायात पदार्पण करताना दिसत आहेत. आता अभिनेत्री श्रेया बुगडेने स्वत:चे हॉटेल सुरु केले आहे. ‘द फिश बिग कंपनी’ असे तिच्या नव्या हॉटेलचे नाव आहे. तिच्या या हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मासांहारी पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे. श्रेयाच्या या नव्या हॉटेलचा एक व्हिडीओही समोर आला आहे. 

श्रेया बुगडेच्या नव्या हॉटेलचा व्हिडीओ

यात तिने तिच्या हॉटेलच्या इंटेरिअरची झलक दाखवली आहे. यात प्रशस्त जागा, लाईटचा योग्य वापर, काही पारंपारिक वस्तू आणि मुंबईशी संबंधित पेटिंग्स पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तिच्या या हॉटेलमध्ये तिने कॉलेजच्या ग्रुपपासून मोठ्या कुटुंबाला एकत्र बसता येईल, अशी सोयही केली आहे. त्याबरोबरच तिने वातावरण प्रसन्न राहण्यासाठी टेबलावर फुलगुच्छही ठेवला आहे. 

श्रेया बुगडेच्या या नव्या हॉटेलचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. याचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. तिच्या या नवीन हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याला अभिनेते संजय मोने आणि सुकन्या मोने, अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि दिग्दर्शक संजय जाधव यांनी हजेरी लावली. या कलाकारांनी तिच्या नव्या हॉटेलला शुभेच्छाही दिल्या. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तिच्या या नव्या हॉटेलचा उद्घाटन सोहळा पार पडला. 

‘द फिश बिग कंपनी’ या हॉटेलमध्ये खवय्यांना माशांचे वेगवेगळे प्रकार चाखायला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिच्या या नव्या व्यवसायासाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार शुभेच्छा देताना दिसत आहे. श्रेया बुगडेच्या आधी अनघा अतुल, तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे अभिनेता निरंजन कुलकर्णी, महेश मांजेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे यांनीही हॉटेल व्यवसाय सुरु केले आहेत.

दरम्यान श्रेया बुगडेने अभिनयाच्या जोरावर मराठी मनोरंजनसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती शाळेत असल्यापासून अभिनय करायची. तिला ‘फू बाई फू’ या कार्यक्रमामुळे संधी मिळाली. पण तिला ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे खरी प्रसिद्धी मिळाली. आता ती अभिनयाबरोबर श्रेयाने व्यवसाय क्षेत्रातही तिचं नशीब आजमावणार आहे.

Related posts