
पुणे / वेल्हे (pragatbharat.com) : पुण्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा पाय घसरून सुमारे ४५ ते ५० फूट खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव येथील रहिवासी असलेला अविनाश श्रावण बागुल हा तरुण आपल्या कुटुंबासह राजगड दर्शनासाठी आला होता. बालेकिल्ल्याकडे चढाई करत असताना, मुख्य आणि अधिकृत मार्ग सोडून तो चुकून दुसऱ्या एका धोकादायक पायवाटेने गेला. यादरम्यान अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट खोल दरीत फेकला गेला.
झाडाचा आधार अन् नशिबाची साथ : या भीषण अपघातात अविनाशचा जीव जाण्याची दाट शक्यता होती, मात्र नशीब बलवत्तर म्हणून दरीत खाली असलेल्या एका मोठ्या झाडाच्या फांद्यांमध्ये तो अडकला. झाडामुळे त्याचा खोल दरीत कोसळण्याचा वेग रोखला गेला आणि त्याचे प्राण वाचले. मात्र, या घसरगुंडीमुळे त्याच्या पाठीच्या मणक्याला गंभीर फ्रॅक्चर झाले असून, मान आणि पायालाही मोठी दुखापत झाली आहे. पर्यटक दरीत अडकल्याची माहिती मिळताच गडावरील शिवप्रेमी आणि प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली.
२ तासांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन : घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि ‘हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम’ तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अतिशय कठीण, दुर्गम आणि धोकादायक कड्यावरून उतरून रेस्क्यू पथकाने तब्बल दोन तास थरारक बचाव मोहीम राबवली. पथकाने अविनाशला सुरक्षितपणे दरीतून बाहेर काढून नातेवाईक आणि पोलिसांच्या ताब्यात दिले, जिथून त्याला तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. या मोहिमेत तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरगे, योगेश गोपी यांच्यासह स्थानिक पर्यटक प्रतीक सावंत, रोहित खबाले आणि पोलीस पाटील सारिका दरडीघे यांनी मोलाची भूमिका बजावली. गड-किल्ल्यांवर फिरताना केवळ अधिकृत मार्गांचाच वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



