‘युनिसेफ’च्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर
जिनिव्हा : ( pragatbharat.com) जगभरात प्रत्येक आठ मुलींपैकी एका मुलीवर लैंगिक अत्याचार होत असून, आतापर्यंत ३७ कोटी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे वास्तव ‘युनिसेफ’ने जारी केलेल्या अहवालातून समोर आले आहे.
युनिसेफच्या अहवालातून मुले-मुली आणि महिलांवर होत असलेल्या बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची संख्या आणि व्याप्ती समोर आली आहे. ही माहिती कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारी आहे. जगातील तब्बल ३७ कोटी अल्पवयीन मुलींना वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्याआधी एकदातरी बलात्कार, लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे, म्हणजेच दर आठ मुलींमागे एका मुलीला या भयंकर अनुभवाचा सामना करावा लागला आहे. समाजमाध्यमाचा वापर करून छळ तसेच अन्य अत्याचारांची गणना केल्यास पीडित मुलींची संख्या ६५ कोटींच्या घरात जाईल, असे यात म्हटले आहे. यामुळे जगभरात बाल अधिकारांचे उल्लंघन किती मोठ्या प्रमाणात सुरु आहे, हे समोर आले आहे.