Are you ready to contest Lok Sabha Election from Satara if Sharad Pawar insist Prithviraj Chavan reaction( प्रगत भारत । pragatbharat.com)

सातारा: राज्यातील लक्षवेधी लढतीची अपेक्षा असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. महायुतीकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या (MVA Alliacne) गोटात साताऱ्यातून कोणाला रिंगणात उतरवायचे, याबाबत पेच निर्माण झाला आहे. अशातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) साताऱ्यातून मविआचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी रविवारी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यानंतर या चर्चेला आणखीनच हवा मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत सातारा लोकसभा मतदारसंघाविषयी भाष्य केले. तुम्हाला साताऱ्यातून उमेदवारी जाहीर झाली तर तुम्ही लढणार का, असा प्रश्न चव्हाण यांना विचारण्यात आला. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, शरद पवार यांच्याकडून साताऱ्यातून लढण्यासाठी माझी मनधरणी सुरु असल्याच्या बातमीत तथ्य नाही. जयंत पाटील आणि माझ्यात साताऱ्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाली. त्यावेळी मी माझी भूमिका त्यांच्यासमोर मांडली. कोणत्याही परिस्थितीत सातारा मतदारसंघ आपल्याला राखला पाहिजे. साताऱ्यात आजपर्यंत कधीही धार्मिक शक्तींचा विजय झाला नाही. त्यामुळे यंदाही साताऱ्यात मविआचा उमेदवार विजयी झाला पाहिजे. सातारा मतदारसंघातील उमेदवार कोण असेल, हे शरद पवार ठरवतील. उमेदवारांच्या नावाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरुच असतात, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

साताऱ्यातून तुम्ही लढणार की नाही?

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना तुम्ही साताऱ्यातून लढणार का, असे विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना चव्हाण यांनी म्हटले की, मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आता त्यांना निर्णय घ्यायचा आहे. शरद पवार गटाने दिलेला उमेदवार आम्हाला मान्य असेल. आम्ही त्याबाबत किंतु, परंतु करणार नाही. पण साताऱ्याच्या जागेवर इच्छूक असलेल्या उमेदवारांबाबत आम्ही विश्लेषण केले आहे. ही आमच्यातील खासगी चर्चा होती. पण शरद पवार गटाने साताऱ्यात कोणालाही उमेदवारी दिली तरी त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

साताऱ्यात आठ दिवसांमध्ये काय घडेल सांगता येत नाही: सतेज पाटील

सातारा लोकसभेच्या उमेदवारावरुन महाविकास आघाडीत सध्या खल सुरु आहे. याबाबत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही भाष्य केले. साताऱ्याची जागा राष्ट्रवादीला गेली तर साताऱ्यामधून उमेदवार निवडून आणण्यास पृथ्वीराज चव्हाण यांचा महत्त्वाचा वाटा असेल. पुढील आठ दिवसात काय होईल, ते एखाद्याला सांगता येत नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

आणखी वाचा

माजी सीएम पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांमध्ये बंद खोलीत चर्चा!

अधिक पाहा..

Related posts