नवी दिल्ली: दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये चक्रावून टाकणारा प्रकार घडला आहे. दिल्लीचा रहिवासी असलेल्या अंकुश दत्ता नावाच्या व्यक्तीनं एका पंचतारांकित हॉटेलात तब्बल ६०३ दिवस वास्तव्य केलं. त्यानंतर एक दमडीही न भरता त्यानं तिथून काढता पाय घेतला. अंकुश दत्ता पळून गेल्याचं समजताच हॉटेल व्यवस्थापनाच्या पायाखालची जमीन सरकली. अंकुशनं हॉटेलला ५८ लाख रुपयांचा चुना लावला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांनी दत्ताला साथ दिल्याचं समजतं. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.एरोसिटीच्या हॉटेल रोजेट हाऊसमध्ये हा प्रकार घडला. हॉटेल चालवत असलेल्या बर्ड एअरपोर्ट हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडच्या विनोद मल्होत्रांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ४०८, ४२०, ४६८, ४७१, १२० बीच्या अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. डीसीपी देवेश महेला यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. दिल्लीचा रहिवासी असलेला अंकुश दत्ता ६०३ दिवस हॉटेलमध्ये राहिला. त्याचं बिल ५८ लाख रुपये झालं. मात्र एकही रुपया न देता तो निघून गेला, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
लग्नात भावाचा संशयास्पद अंत, बहिणीला संशय; तरुणाची पुरलेली बॉडी पोलिसांनी बाहेर काढली अन्…
हॉटेलच्या फ्रंट ऑफिस विभागाचा प्रमुख प्रेम प्रकाशनं घोटाळा करुन अंकुश दत्ताला दीर्घकाळ राहण्याची परवानगी दिली, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. प्रेम प्रकाशनं इनहाऊस सॉफ्टवेअर सिस्टिममध्ये हेराफेरी करुन दत्ताकडून पैसे घेतले असावेत आणि त्याला प्रदिर्घकाळ राहण्याची परवानगी दिली असावी, असा संशय हॉटेल व्यवस्थापनाला आहे.
अंकुश दत्तानं प्रेम प्रकाशसह हॉटेलमधील अन्य कर्मचाऱ्यांच्या साथीनं संपूर्ण कट रचल्याचा आरोप हॉटेल व्यवस्थापनानं केला आहे. दत्तानं ३० मे २०१९ रोजी चेक इन केलं होतं. त्यानं एका रात्रीसाठी खोली बुक केली होती. मात्र त्यानं ३१ मे रोजी चेक आऊट केलंच नाही. तो २२ जानेवारी २०२१ पर्यंत हॉटेलमध्ये मुक्कामाला होता. हॉटेलच्या नियमानुसार, एखादी व्यक्ती ७२ तासांपेक्षा अधिक वेळ रुममध्ये थांबल्यास आणि त्यानं पैसे न भरल्यास याची माहिती कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाला द्यावी लागते. पण प्रेम प्रकाशनं अशी माहिती दिली नाही.
नवाकोऱ्या फ्रिजचा स्विच ऑन करताच जोरदार स्फोट; भिंती कोसळल्या, घराला आग, लाखोंचं नुकसान
दत्ताचं अकाऊंट योग्य दाखवण्यासाठी हेराफेरी केल्याचा आणि त्याच्याकडून शिल्लक असलेली अन्य व्यक्तीच्या बिलात ऍडजस्ट केल्याचा आरोप हॉटेल व्यवस्थापनानं प्रेम प्रकाशवर केला आहे. प्रेम प्रकाशनं खोटी बिलं तयार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.