Maharashtra Rain Updates Heavy Rains In Akola For Two Days Know Details Akola Rains

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Akola News: अकोला जिल्ह्यात (Akola District) गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. तर अनेक नदी नाल्यांना पूर आला. झालेल्या पावसातमुळे दोन चिमुकल्यांना आपला जीव गमावावा लागलाय. दरम्यान, अकोला शहरातील शारदानगर, पार्वतीनगर, गुरुदत्तनगर, मेहरेनगर, रेणुकानगरातील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले होते. या भागातील जवळपास 250 पेक्षा अधिक घरांना पाण्यानं वेढलं होतं. शहरातील लोणटेक नाल्याचं काँक्रिटीकरण न झाल्यानं ही परिस्थिती दरवर्षीप्रमाणे यंदाही ओढवली आहे. घरात शिरलेलं पाणी जाण्यास मार्ग नसल्यानं या नागरी वस्त्यांमधील जनजीवन प्रभावित झालं होतं. तर पार्वती नगरात घरातील ओलाव्यामुळे शॉक लागून एका 15 वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या भागांत दहा वर्षांचा मुलगा नाल्यात वाहून गेला.

शहराच्या अनेक भागांत घुसलं पावसाचं पाणी 

बुधवारच्या रात्री अकोला शहरात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील नाले तुडुंब भरून वाहत होते. अकोला शहरातून वाहणारा लोणटेक नाला जवळपास अडीच किलोमीटर लांबीचा आहे. या नाल्याचं काँक्रिटीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र या नाल्याचं अद्यापही काँक्रिटीकरण झालेलं नाही. त्यामुळे जोरदार पाऊस झाला की, दरवर्षी या नाल्याला पूर येतो आणि परिसरातील वस्त्यात नाल्याचं पाणी शिरतं. त्यामुळे या नाल्याचं काँक्रिटीकरण केव्हा केलं जाणार? असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. 

दरम्यान, जुने शहरातील अकोला पश्चिम आणि अकोला पूर्वमधून वाहणारा लोणटेक नाला ओसंडून वाहत होता. या नाल्याचे पाणी लगतच्या शारदानगर, पार्वतीनगर, गुरुदत्तनगर भागांत शिरल्यानं अनेक घरांना पाण्याचा वेढा होता. तसेच अनेक भाग पाण्यानं वेढलं गेलं होतं. पाणी जाण्यास मार्ग नसल्यानं रस्त्यावर दोन ते तीन फुट पाणी असल्यानं नागरिकांना पाण्यातून जाणं-येणं करावं लागत असून महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले होते. या प्रकारास झालेला जोरदार पाऊस की, फसलेली नालेसफाई? अशी चर्चा या सर्वत्र होत आहे. 

मेहरेनगर, रेणुकानगर भागातील श्रीराम चौक भागात शिरल्यानं साधारण शेकडो घरं पाण्यानं वेढली गेली आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. तर वस्तीतील घरांना पाण्यानं वेढा दिल्यानं नागरिकांना घरातून बाहेर पडणं अवघड झालं होतं. अशीच परिस्थिती एमरॉल्ड कॉलनी भागात उद्भवली होती. विशेष म्हणजे, शहराच्या विविध भागांत पाणी वाहून जाण्याची व्यवस्थाच नसल्यानं पाणी ओसरण्यास उशीर लागला. तर काही भागांतील नागरिक रस्त्यावर साचलेलं पाणी पंपाच्या साहाय्यानं अन्यत्र उपसून फेकण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं.

पाऊस आणि पुरामुळे दोन चिमुकल्यांचा मृत्यू 

अकोला शहरातील पार्वतीनगर भागात सर्वत्र रस्त्यावर पाणी साचले होते. कच्च्या घरांमध्ये ओलावा होता. घराबाहेर पडायचे असल्यास पहिले पाऊल पाण्यात टाकावे लागल होते. दरम्यान, पार्वतीनगर भागातील रहिवासी दुर्गाप्रसाद यादव यांच्या घरात बाथरुमच्या पाईपमधून पाणी शिरले. यातच विजेचा शॉक लागून त्यांच्या घरातील 15 वर्षीय राज यादव याचा मृत्यू झाला. यासोबतच अकोला शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्र रस्त्यावरील खैरमोहम्मद प्लॉट भागात असलेल्या एका नाल्याला पूर आला. या पुराचे पाणी रस्त्यावर साचलं होतं. येथे काही मुलं खेळत असताना, एक दहा वर्षीय मुलगा रस्त्या लगत असलेल्या नाल्यात वाहून गेला. जियान अहमद इक्बाल अहमद असं नाल्यात वाहून गेलेल्या मुलाचे नाव. दरम्यान हा नाला पुढे जाऊन मोर्णा नदीला भेटतो. बुधवारच्या रात्रीपासू त्याची शोध मोहीम सुरू आहे. आज पुन्हा पहाटे मुलाच्या शोधात सर्च मोहीम सुरू झाली, अजूनही त्याचा शोध लागला नाही.

अकोल्यात बुधवार ते गुरूवारच्या 24 तासांत 125.5 मिलीमीटर पाऊस 

अकोला जिल्ह्यात बुधवारच्या रात्री ढगफुटूसदृश्य पाऊस झाला होता. अकोल्यात बुधवार ते गुरुवार या 24 तासांत 125.5 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली. या पावसामुळे शहरातील काही भागांत नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसलंय. यासोबतच डुबकी रोड, गायत्री नगर भागातील घरांमध्ये पाणी घुसलं होतं. यासोबतच अकोला बसस्थानकावरील फलाटावर पाण्याची गळती झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. या पावसाने नुकतीच पेरणी झाल्याने पिकांचं मोठं नुकसान झालं नसलं तरी शेतात पाणी साचल्याने जमिनीचं मोठं नुकसान झालं आहे.

महापालिकेची आपात्कालीन यंत्रणा कार्यान्वित 

अकोला शहरामध्ये पूर सदृश्य परिस्थिती किंवा पूरपरिस्थिती उद्भवल्यास पुरापासून बचावाच्या अनुषंगाने शहरातील नदी, नाला किंवा सखोल भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. कोणतीही आपत्ती आल्यास त्वरित आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपर्क साधावा, असं आवाहन मनपा आयुक्तांनी केलं आहे. महानगरपालिका प्रशासनाव्दारे अग्निशमन विभागामध्ये 24 तास नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू असून कक्ष टोल फ्री क्रमांक – 18002335733 तसेच फोन नंबर – 101, 0724- 2434460, 2432102 आणि मुख्य अग्निशमन अधिकारी तथा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख हारूण मनियार मोबाईल क्रमांक 8857889575 क्रमांकावर संपर्क साधण्याचं अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारे आवाहन केलं आहे.

[ad_2]

Related posts