[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
हे उच्च तापमान म्हणजे उत्तर अमेरिका, आशिया आणि युरोपातील उष्णतेच्या लाटेचा परिणाम असून, उष्णतेच्या लाटा आणि कॅनडा, ग्रीस आदी देशांमधील वणवे यांमुळे लोकांचे आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यावर मोठा परिणाम होत आहे, असे युरोपीयन युनियनची कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस (सी३एस) आणि वर्ल्ड मेटिओरोलॉजिकल ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) यांनी विश्लेषणांती नोंदवले आहे.
या नवीन अभ्यासानुसार, जुलै, २०२३च्या पहिल्या २३ दिवसांत पृष्ठभागावरील हवेचे जागतिक सरासरी तापमान १६.९५ अंश सेल्सिअस होते. आजवरचा सर्वांत उष्ण महिना ठरलेल्या जुलै, २०१९च्या संपूर्ण महिन्यात हे तापमान १६.६३ होते. त्यामुळे जुलै, २०२३चे संपूर्ण महिन्याचे सरासरी तापमान जुलै, २०१९च्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक असेल, हे स्पष्ट झाले आहे, असे या अहवालात म्हटले आहे. पाच जुलै रोजी पृष्ठभागावरील हवेच्या तापमानाची जागतिक सरासरी सर्वाधिक, म्हणजे १७.०८ अंश से. एवढी नोंदवली गेली होती. पाच आणि सात जुलै रोजीदेखील तापमान या उच्चांकापेक्षा किंचितच कमी होते.
हवामान बदलाचा परिणाम
‘जुलैमधील टोकाच्या हवामानाचा लाखो लोकांना फटका बसला. हा हवामान बदलाचा परिणाम आहे. यावरून भविष्यात काय होणार, याची चुणूक दिसत आहे. त्यामुळे हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाला आळा घालण्याची कधी नव्हे एवढी निकड आज निर्माण झाली आहे. हवामानविषयक उपाययोजना ही चैन नव्हे; तर गरज बनली आहे,’ असे ‘डब्ल्यूएमओ’चे सरचिटणीस पेटेरी तालास यांनी सांगितले.
[ad_2]