वेस्ट टू एनर्जी’, ‘प्रधानमंत्री आवास’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन होणार

न्यूज pragatbharat.com नेटवर्क

  •  भाजपा आमदार महेश लांडगे यांची माहिती..
  •  ‘भोसरी व्हीजन-२०२०’मधील वचनपूर्तीचे समाधान…

पिंपरी (दि. २९ जूलै २०२३) :- ‘भोसरी व्हीजन- २०२०’ अंतर्गत हाती घेतलेला राज्यातील पहिला ‘वेस्ट टू एनर्जी’ म्हणजेच कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वयीत झाला आहे. तसेच, सर्वांसाठी घर या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजनेतून पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल १७ हजार ७५ घरांची निर्मिती होत आहे. ही बाब निश्चितच समाधानाची असून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी येथे उभारण्यात आलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे उद्घाटन आणि डूडूळगाव व सेक्टर- १२ येथील प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच, बोऱ्हाडेवाडी येथील प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार, अश्विनी जगताप, आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे यांच्यासह पुण्यातील लोकप्रतिनिधी, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मोशीकरांची दुर्गंधीतून सुटका…

समाविष्ट गाव मोशी येथील कचरा डेपोवर शहराच्या स्थापनेपासून कचरा टाकला जात होता. या ठिकाणी १९९१ मध्ये कचरा डेपोची अधिकृत घोषणा करण्यात आली. कचऱ्याचे डोंगर उभा राहिले. मात्र, ३० वर्षांमध्ये याठिकाणी एकही कचरा प्रकल्प कार्यान्वयीत झाला नाही. परिणामी, मोशी आणि परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामुळे आता मोशीकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

शहरातील प्रत्येकाला हक्काचे घर…

पिंपरी-चिंचवड शहराची ओळख औद्योगिकनगरी, कामगार नगरी अशी आहे. तसेच, आता महाराष्ट्रातील प्रगतीशील शहर आणि ‘फ्युचर सिटी’ म्हणून पाहिले जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातून या शहरात नागरिक वास्तव्यास येत आहेत. त्यामुळे प्रत्येक आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तीला हक्काचे घर मिळावे. यासाठी आम्ही प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प केला. तो पूर्णत्वास नेत तब्बल १७ हजार ७५ घरांची निर्मिती होत आहे. त्यापैकी बोऱ्हाडेवाडीतील १२८८ घरांचा चावी वाटप कार्यक्रम आणि डुडूळगाव व प्राधिकरण सेक्टर-१२ मधील प्रकल्पाचा भूमिपुजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. आगामी काळात प्रत्येक पिंपरी-चिंचवडकराला हक्काचे घर मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.

‘भोसरी व्हीजन-२०२०’ मधील एक-एक प्रकल्प पूर्णत्वास नेत असताना अत्यंतिक समाधान वाटते. पिंपरी-चिंचवड शहर आणि नागरिकांच्या दृष्टीने आगामी ३० वर्षांतील वाढत्या लोकसंख्येच विचार करुन नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिकपणे काम करीत आहोत. २०१४ मध्ये ज्या मुद्यांवर निवडणूक लढवली. त्यापैकी एक कचरा प्रश्नावर ‘वेस्ट टू एनर्जी’च्या माध्यमातून आश्वासनपूर्ती झाल्याचे समाधान आहे. आगामी काळात निश्चितपणे एक विकसित आणि प्रगतीशील शहर आणि ‘फ्युचर सिटी’चा नागरिक म्हणून पिंपरी-चिंचवडकरांना अभिमान वाटेल, असे शहर घडवण्याचा आमचा संकल्प आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा.

Related posts