[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
कोल्हापूर: इचलकरंजी (Ichalkaranji) शहराला दूधगंगा नदीमधून पाणी देण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. या प्रकरणी आजपर्यंत केवळ आरोप प्रत्यारोप होत होते. आता मात्र रक्तपात आणि तलवारीची भाषा होऊ लागली आहे. इचलकरंजीला दूधगंगा नदीतून पाणी दिल्यास रक्तपात होईल असं जाहीर वक्तव्य राज्याचे मंत्री आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. तर इचलकरंजीला पाणी देण्यास विरोध करण्यासाठी नागरिकांनी तलवारी घेऊन बाहेर पडा अस आवाहन माजी आमदार के पी पाटील यांनी केलं आहे.
दूधगंगा नदी मधून इचलकरंजी शहराला पाणी देणारी सुळकुड योजना राज्य सरकारने मंजूर केली. मात्र त्या विरोधात दूधगंगा नदी काठावरची गाव आक्रमक झाली आहेत. हा पाणी प्रश्न इतका टोकाला पोहोचला की थेट मंत्र्यांनी रक्तपाताची भाषा केली. हसन मुश्रीफ यांनी योजने संदर्भातल्या बैठकीमध्ये हे वक्तव्य केले आहे. तर दुसरीकडे माजी आमदार के पी पाटील यांनी देखील तलवारीची भाषा केली आहे.
सन 2020 साली या योजनेला सुरुवात झाली. भाजपचे नेते आणि जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी या योजनेला प्रचंड विरोध केला. त्यावेळी इतर नेत्यांनी साथ दिली असती तर आता आक्षेपार्ह वक्तव्यं करण्याची वेळ आली नसती असं आता समरजितसिंह घाटगे यांनी म्हटलंय.
प्रश्न कोणताही असला तरी जबाबदार व्यक्तींनी रक्तपात किंवा तलवारीची भाषा करणे योग्य नाही. आपली ती संस्कृती नाही अशा शब्दात राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी मुश्रीफांच्या वक्तव्यावर नाराजी केली.
दूधगंगा नदीमधून आधीच कोल्हापूर शहराला त्याचबरोबर कर्नाटकसाठी पाणी आरक्षित ठेवलं जातं.आता पुन्हा इचलकरंजी शहराचा भार या नदीवर पडल्यास उन्हाळ्यामध्ये इथल्या नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागणार आहे. त्यामुळेच पाण्यासाठी हा संघर्ष सुरू झाला असल्याचं चित्र आहे.
काय आहे प्रकरण?
दूधगंगा नदीमधून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर झाली आहे. मात्र या योजनेला सुळकुड परिसरातील ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. या प्रकरणावरून कागल तालुक्यातील एकमेकांचे विरोधक एकत्र आल्याचं दिसून आलं आहे. या सर्व नेत्यांनी एकमुखाने इचलकरंजी शहराला पाणी देण्यास विरोध दर्शवला. शिवाय या योजनेच्या कामाला स्थगिती देण्याची सूचना देखील केली.
इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातच आहे, पाकिस्तानमध्ये नाही
दरम्यान, कागलमधील नेत्यांनी पाण्याला कडाडून विरोध केल्यानतंर इचलकरंजीमध्ये संतप्त भावना उमटल्या आहेत. इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातच आहे, पाकिस्तानमध्ये नाही. त्यामुळे दूधगंगा नदीतील सुळकूड नळपाणी योजनेला स्थगिती न देता ती तात्काळ राबवली पाहिजे. शासनाने मंजूर केलेल्या या योजनेसाठी पुन्हा शासनाकडून मार्गदर्शन मागण्याची गरज का? असा सवाल इचकरंजीतील विविध पक्षांच्या नेत्यांनी आणि इचलकरंजीवासियांनी विचारला आहे.
ही बातमी वाचा:
[ad_2]