[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
‘चीनच्या नकाशाची सन २०२३मधील आवृत्ती अधिकृतपणे सोमवारी प्रसिद्ध झाली. नैसर्गिक संसाधन मंत्रालयाच्या मानक नकाशा सेवेच्या वेबसाइटवर ही नवी आवृत्ती प्रसिद्ध झाली. हा नकाशा चीन आणि जगातील विविध देशांच्या राष्ट्रीय सीमा रेखाटण्याच्या पद्धतीच्या आधारे संकलित करण्यात आहे,’ असे चीनचे अधिकृत वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने सोमवारी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केले.
‘ते भारताचे अविभाज्य भाग’
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा भाग चीनने आपल्या नकाशात दाखवल्याने काँग्रेसने मंगळवारी तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच हे दोन्ही भारताचे अविभाज्य भाग आहेत. बेकायदेशीर सीमांकनाने ते बदलले जाऊ शकत नाहीत, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
आगामी जी-२० परिषदेदरम्यान चीनची भारतीय हद्दीतील घुसखोरी जागतिक स्तरावर उघड करावी, अशी मागणीही काँग्रेसने केंद्र सरकारकडे केली.
‘चीन इतर देशांच्या मालकीच्या प्रदेशांचे नाव बदलून नकाशांवर दर्शविणारा गुन्हेगार आहे. अशा बेकायदेशीर सीमांकन किंवा भारतीय प्रदेशांच्या नामांतरावर काँग्रेसचा तीव्र आक्षेप आहे,’अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये केली आहे.
चीनचा दावा मूर्खपणाचा
काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी चीनचा हा दावा मूर्खपणाचा असल्याचे म्हटले आहे. तिवारी म्हणाले की, चिनी नकाशे हे प्रमाणित नकाशे नाहीत. हे भारत-चीन सीमा विवादाच्या इतिहासाशी जुळत नाहीत. अशा स्थितीत चीनचा दावा मूर्खपणाचा आहे.
‘यापूर्वीही चीन असे दावे’
भारतीय भूभाग आपला असल्याचा चीनचा दावा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पूर्णपणे फेटाळून लावला. जयशंकर म्हणाले की, चीनने नकाशात जे क्षेत्र स्वतःचे म्हणून दाखवले आहेत ते त्यांचे नाहीत. असे करण्याची चीनची जुनी खोड आहे. अक्साई चीन आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत. यापूर्वीही चीन भारताचे काही प्रदेश आपले असल्याचे दाखवून नकाशे काढले आहेत. त्यांच्या दाव्याने काहीही होत नाही. आमच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे. दुसऱ्याची क्षेत्रे आपली आहेत, असे निरुपयोगी दावे करून काहीही होत नाही.
‘सरकारने चीनवर सर्जिकल स्ट्राइक करावा’
चीनच्या या दाव्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी नुकतेच लडाखच्या पँगॉन्ग खोऱ्यामध्ये चीनने घुसखोरी केल्याचे सांगितले होते. याचा अर्थ राहुल गांधी यांनी लडाख दौऱ्यावर चीनबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या खऱ्या आहेत. ‘आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी झाले होते आणि त्यांनी शी जिनपिंग यांचे अभिनंदन केले. त्यानंतर चीनचा हा नकाशा येतो. केंद्र सरकारमध्ये हिंमत असेल, तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करावा,’ असा टोलाही राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला.
[ad_2]