Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar Visit Pusesawali Village Satara Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुसेसावळी, सातारा:  एका व्हायरल पोस्टमुळे साताऱ्यातील पुसेसावळी (Pusesawali) गावात अचानक हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात एकाचा बळी गेला होता. गावातील स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुसेसावळी गावाचा दौरा केला. यावेळी अजित पवारांनी हिंसाचारात मृत झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. 

सोशल मीडियावरील पोस्टमुळे भावना दुखावल्याचे सांगत जमाव आक्रमक झाला होता. पुसेसावळी या गावातील एका समूहाने धार्मिक स्थळावर हल्ला चढवला आणि यात एकाचा बळी गेला. या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या गावात दोन्ही समूहातील लोकांची गाठ भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर शांततेबाबत त्यांनी आवाहन केले. 

यावेळी अजित पवारांनी दंगलीत मयत झालेले नुरन हसन लियाकत शेख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. नुरन यांच्या पत्नीने हिंसाचार कसा झाला, याची माहिती दिली. अजित पवारांनी यावेळी सविस्तरपणे ऐकून घेतले. कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर स्थानिकांशी चर्चा करताना अजित पवारांनी म्हटले की, या प्रकरणात लक्ष घालणार आहे. दोषींवर कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. अनेक लोक पिढ्यानपिढ्या एकत्रिपणे गावात राहत आहेत…कधीही दंगल झाली नाही.. आता पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घ्या असेही आवाहन अजित पवारांनी केले.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळीमध्ये इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव निर्माण झाल्याने 10 सप्टेंबर रोजी जाळपोळ झाल्याची घटना घडली.  या प्रकरणात सातारा पोलिसांकडून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी 10 सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्टवर दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांकडे विचारपूस करण्यात येत असतानाच्या काळात सदर आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आल्यानंतर तणाव निर्माण झाला. हिंसाचारात धार्मिक स्थळाची तोडफोड करण्यात आली होती. 

या घटनेनंतर सातारा पोलिसांनी तात्काळ पावले उचलत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. तीन दिवस जिल्ह्यात इंटरनेट बंदी करण्यात आली. त्याशिवाय, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी हिंसाचार प्रकरणात 34 जणांना अटक केली असून  काही आरोपींचा शोध सुरू आहे. 

 

[ad_2]

Related posts