[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs AUS Facts : चेन्नईच्या मैदानावर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात करणार आहेत. दोन्ही संघाला विश्वचषक विजयाचा दावेदार म्हटले जातेय. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर या दोन्ही संघामध्ये आमनासामना होणार आहे. या सामन्यावेळी प्रतिस्पर्धी खेळाडूंची मैदानावर लढाई होणार आहे. या लढतीकडे सर्वांच्या नजरा असतील, त्याशिवाय सामन्याचा निकालही त्यावरच अवलंबून असेल.
रोहित शर्मा विरुद्ध मिचेल स्टार्क
भारतीय कर्णधार रोहित शर्मा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाविरोधात सुरुवातीला अडखळताना दिसतो. पण ऑस्ट्रेलियाविरोधात तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने मिचेल स्टार्कची गोलंदाजी फोडली होती. पण आकडे पाहिले तर डावखुऱ्या गोलंदाजाविरोधात रोहित शर्मा संघर्ष करताना दिसतोय. अशा स्थितीत रोहित शर्मा आणि मिचेल स्टार्क यांच्यातील लढाई पाहण्यासारखी असेल.
डेविड वॉर्नर विरुद्ध रविचंद्रन अश्विन
भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन नेहमीच डावखुऱ्या फलंदाजासाठी कर्दनकाळ ठरला आहे. डावखुऱ्या फलंदाजाविरोधात अश्विनचे आकडे चांगले आहेत. ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर अश्विनला अडखळत खेळताना दिसतो. नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत अश्विनची गोलंदाजी खेळताना वॉर्नर संघर्ष करत असल्याचे दिसतेय. डावखुरी फलंदाजी सोडून तो उजव्या हाताने फलंदाजी करायला सुरुवात केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात या लढतीकडेही लक्ष असेल.
जसप्रीत बुमराह विरुद्ध स्टीव्ह स्मिथ
ऑस्ट्रेलियाचा चिवट फलंदाज स्टिव्ह स्मिथचा भारताविरोधातील रेकॉर्ड चांगला आहे. भारतीय खेळपट्टीवर स्मिथने खोऱ्याने धावा जमवल्या आहेत. भारतीय गोलंदाजाविरोधातही तो धावांचा पाऊस पाडतो. पण स्टिव्ह स्मिथ भारताच्या जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर संघर्ष करताना अनेकदा दिसला आहे. या दोन खेळाडूमधील लढतही सामन्याचे चित्र स्पष्ट करणारी आहे.
पॅट कमिन्स विरुद्ध केएल राहुल
भारताचा विकेटकीपर फलंदाज केएल राहुल सध्या भन्नाट फॉर्मात आहे. दुखापतीनंतर राहुलने दमदार कमबॅक केले आहे. आशिया चषकात त्याने नाबाद शतक ठोकले होते. विश्वचषकात राहुलचा फॉर्म भारतासाठी महत्वाचा आहे. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात राहुलपुढे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचं आव्हान असेल. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स केएल राहुलविरोधात नेहमीच वरचढ राहिला आहे. अशा स्थितीत आजच्या सामन्यात राहुल कमिन्सचा सामना कसा करतो, याकडेही नजरा लागल्या आहेत.
मिचेल मार्श विरुद्ध कुलदीप यादव
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत मिचेल मार्श याने शानदार फलंदाजी केली होती. मार्श भारतीय वेगवान माऱ्याचा सहज सामना करतो. पण चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव सध्या भन्नाट फॉर्मात आहे, कुलदीपचा सामना करने मार्शसाठी आव्हानात्मक असेल.
[ad_2]