ODI World Cup 2023 IND Vs AUS Team India Won 6 Wickets Against Australia Blog By Ashwin Bapat

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

दाणादाण, धडधड आणि नि:श्वास. चेन्नईच्या विश्वचषक सामन्यातील भारताच्या (Team India) थरारक आणि संघर्षपूर्ण विजयाचं हे तीन शब्दांत वर्णन. टॉस जिंकून पहिली फलंदाजी करणाऱ्या कांगारुंना आपण आधी फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. जाडेजा, कुलदीप आणि अश्विन तिघांनीही ऑसी फलंदाजीच्या नाकीनऊ आणले. वॉर्नर, स्मिथ आणि लाबूशेनसारखे घातक बॅट्समन समोर असताना आपण वेसण घातली. एका वेळी 16.3 ओव्हर्समध्ये एक बाद 74 अशा स्थितीत ऑसी टीम होती. आपल्या गोलंदाजीचं कौतुक अशासाठी की, भागीदारी होत असताना समोर वॉर्नर आणि स्मिथ असताना आपण त्यांना गियर बदलू नाही. तिखट, टिच्चून मारा केला. सगळ्यांनीच. म्हणजे प्रमुख विकेट्स जरी फिरकीने मिळवल्या असल्या तरी बुमरा आणि सिराजनेही स्वस्तात धावा दिल्या नाहीत. जेव्हा वॉर्नर गियर टाकायला गेला तेव्हा कुलदीपने त्याला फसवलं. तर स्मिथला जडेजाने चक्क मामा बनवलं. टेस्ट क्रिकेटची विकेट वाटली ती. ट्रॅप करुन काढलेली. 70 चेंडूत 46 वर एखादा फलंदाज असतो, तेव्हा तुम्ही त्याला अशा पद्धतीने बोल्ड करता त्याला हॅट्स ऑफ. स्मिथच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते.

या दोन धक्क्यांमधून मग आपण त्यांना सावरु दिलं नाही. मुख्य म्हणजे दोन्ही एन्डने प्रेशर क्रिएट केलं आणि ते मेन्टेन केलं. खेळपट्टी फिरकीला साथ देत होती, पण दिशा आणि टप्पाही योग्य राखणं गरजेचं होतं, जे आपण केलं. आपण 15 ते 40 ओव्हर्समध्ये खडूस गोलंदाजी केली. म्हणजे कांगारुंच्या 15 ओव्हर्समध्ये एक बाद 71 ते 39.3ओव्हर्समध्ये सात बाद 150 धावा झालेल्या. म्हणजे 24 ओव्हर्समध्ये फक्त 79 धावा. ठराविक अंतराने विकेट्स घेत राहिल्याने धावांची नदी कशी आटते ते दाखवणारी ही आकडेवारी. इथे टॉस जिंकत पहिली फलंदाजी करण्याच्या निर्णयाचा ऑस्ट्रेलियाने फेरविचार केला असेल का?
पण, या झाल्या जर तरच्या गोष्टी. एक गोष्ट नक्की होती, टार्गेट 200 चं असलं तरी कांगारुंचं फायटिंग स्पिरीट पाहता ते मॅच सहजासहजी सोडणार नाहीत हे नक्की होतं. पहिल्या पाचच ओव्हर्समध्ये याचा प्रत्यय आला.

गिलच्या बदली सलामीला खेळणाऱ्या इशान किशनने जो फटका मारला, तेव्हा कोच द्रविडने त्याला आत आल्यावर नक्की आंगठे धरुन उभं केलं असणार. पहिल्याच ओव्हरमध्ये इतका आत्मघातकी फटका खेळण्याची गरज होती का? तसाच काहीसा अनावश्यक फटका श्रेयस अय्यरही खेळला. एकतर्फी मॅच चुरशीचे करण्याचे भारताचे प्रयत्न सुरु आहेत असं वाटलं जणू. धावफलकावर आकडे होते तीन बाद 2. म्हणजे स्कोरचा आकडा विकेटपेक्षा एकने कमी. क्रिकेटरसिकांच्या ब्लडप्रेशरचा आकडाही 140-80 च्या नॉर्मल रेंजपुढे गेला असणार तेव्हा. चेस मास्टर कोहली आणि क्लासी राहुल यांच्या जोडीवर मदार होती. लक्ष्यही फार मोठं  नव्हतं. पण, तिखट मारा आणि दक्ष क्षेत्ररक्षण यांचा मिलाफ असलेली ऑस्ट्रेलिया आपल्याला चेन्नईच्या उष्ण, दमट वातावरणात घाम गाळायला लावणार हे नक्की होतं. तसंच झालं. त्यातही कोहलीचा तुलनेने एक सोपा कॅच मार्शच्या हातातून निसटला आणि ऑस्ट्रेलियाच्या हातातून मॅचही निसटली. त्या एका क्षणाचा अपवाद वगळता कोहलीने नेहमीच्या ओघवत्या शैलीत फलंदाजी केली. धावांचा पाठलाग करताना त्याचं प्लॅनिंग कमाल असतं. गियर कधी टाकायचा, कोणत्या बॉलरला टार्गेट करायचं. सगळं एखाद्या सॉफ्टवेअरसारखं डोक्यात फिक्स असतं.

म्हणजे पेशंट आयसीयूमध्ये असला तरी डॉक्टर कोहली ऑपरेशन करत असताना पक्की खात्री असते की, पेशंट नुसता आयसीयूमधून बाहेर येणार नाही तर, तो डिस्चार्ज होऊन खणखणीत बरा होऊन घरी येणार. यावेळी या ऑपरेशनमध्ये त्याच्यासोबत राहुल होता. राहुल ऑस्ट्रेलिया मालिकेपासून फॉर्मात आहे. मात्र आज नुसत्या फॉर्मची नव्हे तर, त्याचं जे नाव आहे, त्या नावाच्या खेळाडूसारखं अर्थात त्याचा कोच राहुल द्रविडसारखं टेम्परामेंट दाखवण्याची गरज होती. याबाबतीत राहुल आपल्या राहुल नावाला जागला. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये त्याने सांगितलं देखील. माझी आणि विराटची चर्चा झाली, त्यानुसार मी कसोटी सामन्यासारखं संयमाने खेळावं असं त्याचं म्हणणं होतं. राहुल अगदी तसाच खेळला. पहिल्या 50 धावा 72 चेंडूंमध्ये केल्यावर नंतरच्या 47 मात्र त्याने 43 चेंडूंत केल्या. एव्हाना मॅच आपल्या कंट्रोलमध्ये आली होती.

मिशन वर्ल्डकपची सलामी विजयी तुतारी फुंकून झाली. पण, हा विजय सफाईदार नव्हता. घशाला कोरड पडल्यानंतरचा ओलावा होता तो. पुढे धोकादायक पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, आपल्याला अधूनमधून नडणारे बांगलादेश असे पेपर सोडवायचेत. असं असलं तरीही इतका लांबवरचा विचार करण्यापेक्षा मॅच बाय मॅच जात विश्वचषकाकडे कूच करुया.

[ad_2]

Related posts